
माजी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर ईडीने आज छापेमारी केली. याबाबत बोलत असताना मुश्रीफ यांनी, राजकारणात अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर याचा निषेध झाला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे. इतकेच नाही तर भाजपचा एक नेता आपल्याविरोधात कारवाई व्हावी यासाठी दिल्लीला अनेकदा चकरा मारत होता असा आरोपही त्यांनी केला आहे.
राजकारणात अशा पद्धतीने कारवाई होणार असेल तर त्याचा सर्वत्र निषेध झाला पाहिजे, अशी भूमिका हसन मुश्रीफ यांनी मांडली.
— NCP (@NCPspeaks) January 11, 2023
हसन मुश्रीफ यांनी या कारवाईवर प्रतिक्रिया देण्यासाठी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला आहे. हा व्हिडीओ राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांच्या ट्विटर हँडलवरून प्रसिद्ध केला आहे.यामध्ये हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे की, ‘कागलमधील भारतीय जनता पक्षाच्या नेत्याने दिल्लीमध्ये अनेक चकरा मारून माझ्यावर कारवाई करावी असे प्रयत्न सुरू ठेवले होते. चार दिवसात माझ्यावर कारवाई होणार असे सांगण्यात आले होते. अशा प्रकारे नाऊमेद करण्याचे काम चालले असून हे अतिशय गलिच्छ राजकारण आहे.’