हॅटट्रिक कोणाची? दिल्लीच्या विजयाची की हैदराबादच्या पराभवाची

आयपीएलच्या यंदाच्या मोसमात सलग दोन सामन्यांमध्ये विजय मिळवत दमदार सुरुवात करणारा दिल्ली कॅपिटल्सचा संघ उद्या पहिल्या दोन लढतींत पराभूत होणाऱया सनरायझर्स हैदराबादला भिडणार आहे. याप्रसंगी श्रेयस अय्यरचा दिल्ली कॅपिटल्सचा संघ विजयाची हॅटट्रिक साधतोय की डेव्हिड वॉर्नरचा सनरायझर्स हैदराबादचा संघ सलग तिसऱया लढतींत पराभवाला सामोरे जातोय, या प्रश्नाचे उत्तर उद्या अबुधाबी येथील शेख झायेद स्टेडियममध्ये मिळेल.

फलंदाज फॉर्ममध्ये

रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनाखाली दिल्ली कॅपिटल्सचा संघ चांगला आकाराला येतोय. पहिल्या दोन्ही लढतींत याची झलक पाहायला मिळाली. पृथ्वी शॉ, शिखर धवन, श्रेयस अय्यर, रिषभ पंत, मार्कस स्टोयनीस यांनी आपली चमक दाखवलीय. शिमरोन हेथमायर याला अद्याप ठसा उमटवता आला नसला तरी सलग दोन लढतींतील विजयामुळे त्याचे अपयश झाकून गेले आहे. पण दिल्ली कॅपिटल्सला त्याच्या आक्रमक फलंदाजीची गरज केव्हाही भासू शकते. फलंदाजांची भट्टी जमून आली असल्यामुळे अजिंक्य रहाणेला बेंचवरच बसावे लागेल अशी चिन्हं आहेत.

भुवीला सूर गवसेना

सनरायझर्स हैदराबादने 2016 साली या स्पर्धेचे जेतेपद पटकावले होते. त्या मोसमात डेव्हिड वॉर्नर व भुवनेश्वरकुमार यांनी जबरदस्त कामगिरी केली होती. या मोसमात मात्र दोघांनाही अद्याप चांगली कामगिरी करता आलेली नाही. गोलंदाजी विभागात सनरायझर्स हैदराबादला अपयश आले आहे. राशीद खानकडून अपेक्षा पूर्ण झालेल्या नाहीत. अष्टपैलू जेसन होल्डरला संघात प्रवेश देऊन गोलंदाजी तसेच फलंदाजीची खोली सनरायझर्स हैदराबादला वाढवता येऊ शकते.

विल्यमसन फिट झाला

न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुखापतीमधून बरा झाला आहे. तो उद्याच्या लढतीत खेळू शकणार नाही. पण आता सनरायझर्स हैदराबादचा संघ कोणत्या चार परदेशी खेळाडूंना अंतिम अकरामध्ये संधी देतोय हे पाहणे रंजक ठरणार आहे. मागील लढतीत कर्णधार डेव्हिड वॉर्नर, सलामी फलंदाज जॉनी बेअरस्टॉ, अष्टपैलू मोहम्मद नाबी आणि लेगस्पिनर राशीद खान या चार खेळाडूंचा समावेश संघामध्ये करण्यात आला होता. आता केन विल्यमसनला संघात एण्ट्री देऊन मोहम्मद नाबी किंवा जॉनी बेअरस्टॉला संघाबाहेर काढण्यात येऊ शकते. जॉनी बेअरस्टॉकडे यष्टिरक्षणाची जबाबदारी देऊन केन विल्यमसनच्या प्रवेशासह एखादा अतिरिक्त गोलंदाज खेळवण्याची शक्कलही यावेळी लढवण्यात येऊ शकते.

कॅगिसो रबाडा, ऍनरीच नॉर्जे जबरदस्त

रवीचंद्रन अश्विन व इशांत शर्मा यांच्या अनुपस्थितीत दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजीची धुरा कॅगिसो रबाडा व ऍनरीच नॉर्जे हे वेगवान गोलंदाज सांभाळत आहेत. अमित मिश्रा, अक्षर पटेल हे फिरकी गोलंदाज त्यांना उत्तम साथ देत आहेत. आता रबाडा ऍण्ड कंपनीला उद्या डेव्हिड वॉर्नरच्या ब्रिगेडला रोखावे लागणार आहे.

  • आजची लढत – दिल्ली कॅपिटल्स Vs वि.सनरायझर्स हैदराबाद (शेख झायेद स्टेडियम, अबुधाबी रात्री 7.30 वाजता)
आपली प्रतिक्रिया द्या