जालन्यातील हातडी शिवारात गावठी पिस्तुलातून अज्ञाताने झाडली गोळी, तरुण गंभीर जखमी

जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यातील हातडी शिवारात बुलेट मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तिघांनी गावठी पिस्तुलच्या सहाय्याने एकाच्या डोक्यात गोळी मारून गंभीर जखमी केल्याची घटना सोमवारी, 8 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात वाजेच्या सुमारास घडली आहे. घनसावंगी तालुक्यातील काकडे कंडारी येथील जीवन महादेव जाधव या तरुणाच्या डोक्यात गोळी लागल्याने गंभीर जखमी झाला आहे.

जखमी तरुणाला पुढील उपचारासाठी संभाजीनगर येथे पाठवण्यात आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे. काकडे कंडारी येथील ज्ञानेश्वर हनुमान गायकवाड, वैभव बंडू राऊत आणि जीवन महादेव जाधव हे तिघेजण सोमवारी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास कंडारी येथून रानडुकराची शिकार करण्यासाठी हातडी शिवारात आले होते. सोयंजना-हातडी रोडवर कंडारी टी पॉइंटवर आले असता, काळ्या रंगाच्या विना नंबरच्या बुलेटवरून आलेल्या अनोळखी तिघांनी मोटारसायकलवर मागे बसलेल्या जीवन जाधव याच्यावर गावठी पिस्तुलाने दोन गोळ्या झाडल्या. यातील एक गोळी जीवनच्या डोक्यात लागली, तर दुसरी गोळी त्याच्या कानशिलाच्या अगदी जवळून निघून गेली. गंभीर जखमी जीवनला सोबतच्या मित्रांनी तातडीने परतूर पोलिसांच्या मदतीने पुढील उपचारासाठी परतूर आणि नंतर जालना येथे हलविले.

घटनेची माहिती मिळताच परतूरचे पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, उपनिरीक्षक कमलाकर अंभोरे यांनी घटनास्थळाची पाहणी करून पंचनामा केला. अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख यांनी देखील घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासकामी पोलिसांना सूचना दिल्या आहेत. या घटनेत जखमी जीवन जाधव याचा मेहुणा बळीराम गायकवाड याचे काही दिवसांपूर्वी हातडी येथील काही जणांसोबत भांडण झाले होते. याच भांडणातून हातडी येथील काही जणांनी जीवन जाधव याच्यावर हल्ला झाला असावा अंदाज व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी परतूर पोलिसांची पथके रवाना करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे यांनी दिली आहे.