हाथरस पीडितेवर रात्रीच्या अंधारात पोलिसांनी केले अंतिम संस्कार

उत्तरप्रदेशच्या हाथरस येथील निर्भयाची दोन आठवड्यांपासून मृत्यूशी सुरू असलेली झुंज मंगळवारी संपली. या घटनेने संपूर्ण देशात संतापाची लाट उठली आहे. बलात्काऱ्यांना फाशीची मागणी केली जात असतानाच या प्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांच निर्दयीपणा समोर आलेला आहे. पोलिसांनी कुटुंबाला घरात बंद करून पीडितेवर शेतात अंत्यसंस्कार केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेबद्दल संशय व्यक्त होत आहे.

“पोलिसांनी सुरुवातीला आम्हाला आमच्या मुलीला घरी न नेता थेट अंत्यसंस्कार करण्यास सांगितले. मात्र आम्हाला तिला घरी न्यायचे होते. रितसर पंरंपरेने तिचे अंत्यसंस्कार कराय़चे होते. मात्र पोलीसांनी मुलीचा मृतदेह गावात आणला पण ते थेट शेतात घेऊन गेले. आम्ही विरोध केला तर आम्हाला घरात बंद केले. तिच्या मृतदेहाचे अंतिम दर्शन देखील करता आले नाही’ असा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे.

14 सप्टेंबर रोजी उत्तरप्रदेशातील हाथरस जिह्यात चंदपा या चिमुकल्या गावात काळीज गोठवून टाकणारी घटना घडली. आई व भावाबरोबर शेतात जनावरांसाठी चारा आणण्यासाठी गेलेल्या दलित तरुणीला गावातीलच चार उच्चवर्णिय तरुणांनी बाजरीच्या शेतात ओढून नेले आणि तिच्यावर सामुहिक बलात्कार केला. बलात्कार केल्यानंतर या नराधमांनी तरुणीची जीभ कापली, तिच्या कंबरेचे हाड मोडले. बेशुद्धावस्थेत आढळलेल्या या मुलीला सुरूवातीला अलिगड वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. 19 सप्टेंबर रोजी दंडाधिकारी तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोहोचले. मात्र तिला बोलताच येत नव्हते. 22 सप्टेंबर रोजी तरुणीने इशाऱ्यावरून आपबिती कथन केली. त्यावरून पोलिसांनी संदीप, रामपुमार, लवुश आणि रवि या चौघांना अटक केली आहे. पोलिसांनी पाच दिवस काय केले असा सवाल पीडितेच्या कुटुंबाने केला आहे. तरुणीवर अत्याचार करणारे गावातीलच आहेत. ते नेहमीच गुंडगिरी करतात. पोलीस, कायद्याचा त्यांना धाक नाही. आता गावात परत जाण्याचीही भीती वाटते असे पीडितेचा भाऊ म्हणाला.

फासावर लटकवा त्यांना…

अभिनेता अक्षय कुमार याने ‘आरोपींना फासावर लटकवा’ अशी संतप्त प्रतिक्रिया ट्विटरवर दिली आहे. आपले कायदे आणि त्यांची अंमलबजावणी इतकी कडक असली पाहिजे की बलात्काराचा विचार करणाऱ्याचाही भीतीने थरकाप होईल! दोषींना फासावर लटकवा. दिया मिर्झा, फरहान अख्तर, रिचा चढ्ढा आदी कलाकारांनीही या घटनेचा निषेध केला आहे.

आपली प्रतिक्रिया द्या