हतकणंगलेत सहा महिन्यांपासून पाण्यासाठी वणवण, नागरिकांचा नगरपंचायतीवर ‘आक्रोश’ मोर्चा

सहा महिन्यांपासून विस्कळीत असलेला पाणीपुरवठा सुरळीत करावा, याकरिता हातकणंगलेतील नागरिकांनी नगरपंचायतीवर आक्रोश मोर्चा काढला. मोर्चात महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. पाणीपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत नगराध्यक्ष, नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या खुर्चीत न बसण्याचे आश्वासन दिल्यानंतर मोर्चा शांत झाला.

नवीन विद्युत पंप बसवूनही आठ ते दहा दिवसांपासून हातकणंगले शहराचा पाणीपुरवठा बंद आहे. ऐन सणांच्या दिवसांतच पाण्यासाठी नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी घागर मोर्चा काढला. नगराध्यक्षांसह नगरसेवकांना घेराव घालत महिलांनी त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार केला. या प्रश्नांना उत्तर देताना संबंधित खात्याचे सभापती, नगरसेवकांची चांगलीच तारांबळ उडाली. समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नागरिक अधिकच आक्रमक झाल्याचे पाहून हा मोर्चा बाजारपेठ येथील व्यासपीठावर घेण्यात आला. नागरिकांना शांत करण्याचा नगराध्यक्ष अरुणकुमार जानवेकर यांनी प्रयत्न केला. मात्र, मोर्चेकऱयांचे समाधान न झाल्याने गावचा पाणीपुरवठा सुरळीत होत नाही, तोपर्यंत एकही नगरसेवक अथवा नगराध्यक्ष नगरपंचायतीमध्ये जाऊन खुर्चीवर बसणार नाही व पाणीपट्टी माफ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली.

महिला नगरसेवकांच्या राजीनाम्याची मागणी

हातकणंगले नगरपंचायतीमधील महिला उमेदवार निवडून येऊनदेखील त्यांचा कारभार पुरुष मंडळीच करत असल्याने या मोर्चात त्यांच्यावरही रोष ठेवण्यात आला. तुम्ही पद स्वीकारता व तुमचा कारभार दुसरेच करत असतात, त्याला जबाबदार कोण? तुम्हाला पदाची गंभीरता नसेल तर राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. नगराध्यक्षांसह नगरसेवक मोर्चाला सामोरे येत असतानाच ‘चोर आले रे चोर आले’ अशा घोषणा आंदोलनकर्त्यांनी दिल्या.