हौलूबाय आणि कोकणातील उत्साह

71
फोटो: गुगलवरून

>>चंद्रशेखर के. पाटील

फाल्गुन शुद्ध पौर्णिमा म्हणजेच होळी पौर्णिमा. रायगड जिल्ह्यातही होळीचा उपवाHaigस घराघरात असतो, दुपारपासूनच तिखटगोड सणाची लगबग सुरू असते. खासकरून त्यात पुरणपोळीचा मोठा बेत असतो. संध्याकाळी गृहिणी खास ठेवणीतल्या पेहरावात, दागिन्यांत, साजशृंगारात सजून आरती, नैवेद्याचा भरलेले ताट सांभाळत कुटुंबासोबत होळी माळावर मोठ्या हौसेने येतात.

उंच सावरीच्या खोडामधून दैवी स्वरूपात अवतीर्ण झालेली गौरवर्णीय हौलूबाय (होळी) आदल्या दिवशीच ग्रामस्थांनी पूजेस्थळी उभी केलेली असते. खोडापासून शेंड्यापर्यंत शृंगारलेल्या होळीच्या चारी बाजूने सडासारवण करून कणे-रांगोळी काढलेली असते. कागदी शाईलीच्या रंगीत पताकांनी संपूर्ण होळीचा माळ सजलेला असतो. विजेच्या धूसर प्रकाशात निरंजन, अगरबत्तीच्या लुकलुकत्या झुलत्या ज्योतींच्या सुगंधी वातावरणात अखंड श्रद्धेची भावुकता अधिक गडद होते. होळी पूजेचा पहिला मान गावच्या पाटलाचा असतो. त्यानंतर पूजा करणाऱ्यांची एकच गर्दी होते. सौभाग्यलेणे, वेणी, हळद-कुंकू अशा विविध पूजा साहित्यानिशी वर्षातून येणाऱ्या हौलूबायची पूजा केली जाते.

लख्ख पिठूर चांदण्या रात्री होळी माळावर वेगवेगळ्या खेळांसोबत ग्रामीण बाया-माणसे होळीची धार्मिक पारंपरिक गाणी गाताना भाऊबहीण, माहेर-सासर अशा मायेचा ठाव घेणाऱ्या गाण्यांचा जोर अधिक असतो. मध्यभागी भजनाचा फड रंगतो. चहापाणी, प्रसादाची लगबग सुरू असते. रात्री बारा वाजता समस्त गावकरी होळीच्या माळावर जमतात. पेंढा, केंबली, झाडाझुडपांमध्ये होळीचा खांब वेढला जातो. नंतर ग्रामस्थांची होळी प्रदक्षिणा सुरू होते. ढोल, ताशे, बॅण्ड अशी वाद्ये वाजवली जातात. सर्वच मंडळी जल्लोषात, शिमग्याच्या तिखट, कडवट आतषबाजीने सारा परिसर ढवळून काढतात. पाच प्रदक्षिणा होताच समईच्या ज्योतीने होळी प्रज्वलित केली जाते. आकाशाला भिडणाऱ्या तांबड्या-निळ्या ज्वाळा, ठिणग्यांनी माळरान, डोंगराळ पट्टा उजळून निघतो. वाईट प्रवृत्तींना आहुती देताना चांगल्या गोष्टींसाठी संकल्प केला जातो. नारळ, मिठाई, अंडी, कोंबडं, अक्षतांच्या पूर्णत्वाची आहुती अर्पण करून शांतीचे आवाहन केले जाते. कष्टकरी बळीराजा येणाNया पीकपाण्यांच्या सुगीसाठी आशीर्वाद मागतो. होमामध्ये मिळालेले भाजके नारळ व इतर प्रसादांचा प्रसाद करून तो वाटला जातो. त्यानंतर होळी माळावर जागरणाचा कार्यक्रम असतो.

दुसरा दिवस शिमगा धुळवडीचा. आदल्या रात्रीचे जागरण असले तरी प्रत्येक जण धुळवड खेळण्यासाठी सज्ज असतो. सकाळपासून घुमणारा शिमगा गोतावळ्यात चांगलाच फुलतो. गावातील तरुण, आबालवृद्ध पारंपरिक वेशभूषेत विविध प्रकारची सोंगं घेऊन पाड्यापाड्यांतून शिमग्याचा खेळ मागत फिरत असतात. तरुण पोरांचा ऐना का बैना, गुलालाचा खेळ, गावातल्या बायामाणसांचा ‘डेरा’, आदिवासी वाड्यांमधून ठाकूर, कातकरी आदिवासी नृत्याचे मोठमोठे फेर धरतात. पारंपरिक दुर्मिळ गाण्यांच्या माध्यमातून आपल्या रानजाई संस्कृतीची खरी ओळख करून देतात. मोठे ढोल, झांज, चाळ अशा वाद्यांच्या तालावरील त्यांच्या वेगळ्या नृत्याचा अनुभव मंत्रमुग्ध करणारा असतो. पौर्णिमेचा शिमग्याचे रोडावलेले रोंबाट पंचमीला कलत्या दिवसाच्या साक्षीने मावळते आणि त्याचबरोबर होळीतील निखारेसुद्धा शांत होतात.

आज प्रत्येक माणूस आपल्या आयुष्याची श्रीमंती कशी वाढवली जाईल अशाच एका जीवघेण्या शर्यतीत एकमेकांपुढे पळताना दिसत आहे आणि त्यामुळेच त्याला आपल्या मूळ संस्कृतीचा, सणांचा विसर पडला आहे. शहरी जीवनात नातीगोती, मैत्री, मनं जोपासणारे, आनंद देणारे सण काही तासांतच उरकण्यात धन्यता मानली जाते. हा प्रभाव आता ग्रामीण भागातही जाणवत आहे. पूर्वी १५ दिवस घुमणारा आनंदाचा शिमगा अवघ्या दोन-तीन दिवसांचाच पाहुणा झाला आहे. हा बदलत्या काळाचा प्रभाव म्हणावा की बदलणारी मानवी मनोवृत्ती?

आपली प्रतिक्रिया द्या