दादरमध्ये फेरीवाल्यांच्या जागा वाढल्या

सामना प्रतिनिधी । मुंबई

पालिका प्रशासनाने फेरीवाला झोन आणि फेरीवाल्यांच्या जागांची दुसरी यादी प्रसिद्ध केल्यामुळे 24 वॉर्डांतील फेरीवाल्यांच्या बसण्याच्या जागेचे चित्र स्पष्ट झाले आहे. या दोन्ही याद्यांनुसार सर्वाधिक फेरीवाल्यांची गर्दी कुर्ल्याच्या एल वॉर्ड परिसरात असेल. या विभागात 50 रस्ते फेरीवाला झोन म्हणून निवडण्यात आले असून त्यावर तब्बल दहा हजार फेरीवाले कोंबण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ भांडुप, लालबाग, परळ, कांदिवली, मालाड, दादर येथे फेरीवाल्यांची संख्या सर्वाधिक असणार आहे. विशेष म्हणजे बोरिवली, घाटकोपर, गिरगाव, विलेपार्ले, अंधेरी परिसरात कमीत कमी जागा फेरीवाल्यांना देण्यात आल्या आहेत.

फेरीवाल्यांना शिस्तीत बसवण्यासाठी पालिका प्रशासनाने फेरीवाल्यांच्या जागांची दुसरी यादी नुकतीच प्रसिद्ध केली. दोन्ही याद्या मिळून 24 वॉर्डांतील फेरीवाल्यांसाठी 78 हजार 670 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. काही वॉर्डांमध्ये जास्तीत जास्त रस्ते फेरीवाला झोन म्हणून निवडण्यात आले आहेत. तर काही ठिकाणी कमी रस्त्यांवर जास्त फेरीवाल्यांना जागा देण्यात आल्यामुळे अशा वॉर्डांमध्ये फेरीवाल्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे. या दोन्ही याद्यांवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या आहेत. मात्र ठोस कारण असल्याशिवाय या यादीत आणि झोनमध्ये बदल केले जाणार नसल्याचे आधीच अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. फेरीवाला धोरण राबवण्याची प्रक्रिया लांबल्यामुळे गेल्या काही वर्षांत फेरीवाल्यांची संख्या वाढलेली असली तरी सर्वेक्षणात पात्र ठरलेल्या फेरीवाल्यांनाच या निश्चित केलेल्या जागांवर बसता येणार असल्याचेही अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे.

दादरमध्ये गर्दी होणारच!

पहिल्या यादीत दादर, वरळी, प्रभादेवी, माटुंगा, माहीम परिसरात फेरीवाल्यांना कमी जागा देण्यात आल्या होत्या, मात्र या दुसऱया यादीत प्रशासनाने ही कसर भरून काढली आहे. या यादीत परळ, लालबाग आणि दादरमध्ये मोठय़ा प्रमाणावर जागा देण्यात आल्या आहेत. तर गोवंडी, चेंबूरमधील सर्वाधिक 112 रस्ते फेरीवाला झोन म्हणून निवडण्यात आले आहेत. दोन्ही याद्या मिळून गिरगाव, काळबादेवी, बोरिवली, घाटकोपर, कांदिवली, अंधेरी, विलेपार्ले अशा उच्चभ्रू परिसरात सर्वात कमी फेरीवाले दिसतील असे चित्र स्पष्ट झाले आहे.