खरी पदवी असेल तर मोदी ती दाखवत का नाहीत? केजरीवाल यांचा सवाल

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर पुन्हा एकदा तिखट शब्दात हल्ला चढवला आहे. शनिवारी केजरीवाल यांनी एक पत्रकार परिषद बोलावली होती, यामध्ये त्यांनी म्हटले की देशाचा पंतप्रधान हा सुशिक्षित असणे गरजेचे आहे. शिकलेला माणूस गटारातून गॅस तयार करण्याबाबत किंवा ढगांपाठी लढाऊ विमाने रडारही पकडू शकले नाही अशी विधाने करू शकणार नाही. त्यांच्या या विधानांमुळे त्यांना विज्ञानाबाबत माहिती नसल्याचे दिसून येत असल्याचे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

मोदींची डिग्री मागितली म्हणून केजरीवालांना दंड

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पदवी प्रमाणपत्र न देण्याचा आदेश गुजरात हायकोर्टाने दिला आहे. केंद्रीय माहिती आयोगाने गुजरात विद्यापीठाला यासंदर्भात दिलेले निर्देश रद्द करतानाच न्यायमूर्ती बिरेन वैष्णव यांनी मोदींची डिग्री मागितली म्हणून केजरीवाल यांना 25 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंडाची रक्कम गुजरात राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा केली जाणार आहे. दरम्यान, न्यायालयाच्या निर्णयानंतर अरविंद केजरीवाल यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे.

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पीएमओकडे मोदींच्या पदवीची माहिती मागितली होती. एप्रिल 2016मध्ये तत्कालीन मुख्य माहिती अधिकारी एम. श्रीधर आचार्युलू यांनी गुजरात आणि दिल्ली विद्यापीठाला नरेंद्र मोदी यांच्या पदवीबद्दलची माहिती केजरीवाल यांना देण्यात यावी, असे निर्देश दिले होते. गुजरात विद्यापीठाने या निर्देशांविरोधात तीन महिन्यांनंतर गुजरात उच्च न्यायालयात याचिका दाखल करून मोदी यांच्या पदवीची माहिती आरटीआय कायद्यांतर्गत केजरीवाल यांना देण्याचा आदेश रद्द करण्याची विनंती केली होती.

आपले पंतप्रधान किती शिकले आहेत, हे जाणून घेण्याचा अधिकार या देशातील नागरिकाला नाही का? न्यायालयात त्यांनी ड्रिगी दाखविण्यास कडाडून विरोध केला, का? त्यांची डिग्री दाखविण्याची मागणी करणाऱ्यालाच दंड ठोठावला. हे काय सुरू आहे? अशिक्षित पिंवा कमी शिकलेला पंतप्रधान देशासाठी अत्यंत धोकादायक आहे.
– अरविंद केजरीवाल, मुख्यमंत्री