खासगी वाहनांवर ‘न्यायाधीश’ ‘पोलीस’ पाटी लावल्यास कारवाई होणार

सामना प्रतिनिधी । मुंबई

खासगी वाहनांवर ‘न्यायाधीश’, ‘पोलीस’ किंवा वाहतूक शाखेचा लोगो लावणे यापुढे महागात पडणार आहे. खासगी गाडीवर न्यायाधीश लिहू नका, असे स्पष्ट आदेश मुंबई उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयांच्या न्यायाधीशांना दिले आहेत तर पोलीस लिहिलेली पाटी किंवा वाहतूक शाखेचा लोगो लावलेल्या खाजगी वाहन चालकांवरही कडक कारवाई केली जाणार आहे.

मुंबई उच्च न्यायालयाने जून 2010 आणि फेब्रुवारी 2011 मध्ये सर्व कनिष्ठ न्यायालयांमधील न्यायाधीशांना खासगी वाहनांवर ‘न्यायाधीश’ असे लिहिण्यास बंदी घातली होती. त्या आदेशाचे न्यायाधीशांकडून पालन होत नसल्याचे निदर्शनास आल्यामुळे नाराजी व्यक्त करत उच्च न्यायालयाने यासंदर्भात एक परिपत्रकच प्रसिद्ध केले. न्यायाधीश, दंडाधिकारी, जज असे शब्द खासगी वाहनांवर लिहू नयेत अशी तंबी या परिपत्रकाद्वारे दिली आहे. कुठेही गाडी पार्क करता यावी, शिवाय गाडीवर कोणतीही कारवाई होऊ नये यासाठी गाडीच्या पुढील काचेच्या दर्शनी भागी ‘पोलीस’ लिहिलेली पाटी किंवा वाहतूक शाखेचा लोगो लावण्याचे फॅडही सध्या बळावले आहे. पोलीस नसलेले लोकही अशी पाटी आणि लोगो लावून मिरवत असल्याचे वाहतूक विभागाच्या निदर्शनास आले आहे. अशा गाडय़ांवर कारवाई करण्याचे आदेश वाहतूक सह-पोलीस आयुक्त मधुकर पांडय़े यांनी दिले आहेत.