विनाहेल्मेट बाईक चालवणार्‍या चालकाला मारहाण, पोलिसांविरोधात तक्रार दाखल करा

1206
mumbai-highcourt

विनाहेल्मेट बाईक चालवणार्‍या चालकाला चोप देणार्‍या पोलिसांना मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती एन. जे. जमादार यांच्या खंडपीठाने आंबोली पोलीस ठाण्यातील संबंधित पोलिसांविरोधात एफआयआर दाखल करण्याचे आदेश दिले.

14 डिसेंबर 2018 रोजी समीर शेख जोगेश्वरी रेल्वे स्थानकाजवळून आपल्या नातेवाईकासह बाईकने जात होता. त्यावेळी हेल्मेट नसल्याने तेथील पोलिसांनी त्याला हटकले व दंड भरण्यास सांगितला. मात्र समीरने याला विरोध केला. त्यावेळी पोलिसांसोबत त्याची बाचाबाची झाली. या घटनेचे समीरने आपल्या मोबाईलमध्ये व्हिडीओ रेकॉर्डिंग केले. हे पाहताच पोलिसांनी त्याचा मोबईल काढून घेत त्याला चौकीत नेले. तेथील महिला पोलीस कॉन्स्टेबलसह इतर पोलिसांनी बेदम मारहाण केली. याप्रकरणी समीरने पोलीस कॉन्स्टेबल शरद सानप, सहाय्यक पोलीस निरीक्षक सोनटक्के, पोलीस निरीक्षक सागर, महिला हवालदार संगीता कांबळे आणि पोलीस हवालदार सागर कोंडविलकर यांच्या विरोधात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांकडे तक्रार केली परंतु त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. तसेच आपल्या विरोधात सरकारी कामांत अडथळा आणल्याचा खोटा गुन्हा दाखल केला. याप्रकरणी दिंडोशी कोर्टाने मुंबई पोलीस आयुक्तांना घटनेच्या चौकशीचे आदेश देऊनही कारवाई करण्याचे आदेश दिले होते, परंतु त्याची दखल घेतली न गेल्याने मुंबई उच्च न्यायालयात समीरने धाव घेत दाद मागितली. हायकोर्टाने या याचिकेची गंभीर दखल घेत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले.

आपली प्रतिक्रिया द्या