दुरुस्तीप्रसंगी हात गमावलेल्या इलेक्ट्रिशियनला भरपाई देण्याचे महावितरणला न्यायालयाचे आदेश

257
high-court-of-mumbai

दुरुस्तीच्या कामावेळी झालेल्या अपघातात दोन्ही हात गमावलेल्या इलेक्ट्रिशियनला नुकसानभरपाई देण्यास टाळाटाळ करणार्‍या महावितरणला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच झटका दिला. कंपनी आपली जबाबदारी झटकू शकत नाही. त्यामुळे अपघातात दोन्ही हात गमावलेल्या इलेक्ट्रिशियनला नुकसानभरपाई द्यावीच लागेल असे स्पष्ट करत न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठाने महावितरणला झापले. एवढेच नव्हे तर चार आठवड्यांत ही भरपाई दिली पाहिजे असेही बजावले.

इलेक्ट्रिशियन म्हणून काम करणारे सदाशिव कटके यांना 2018 साली 11 किलोवॅटच्या इलेक्ट्रिक पोलवरील दुरुस्तीच्या कामासाठी महावितरणच्या टेक्निशियन आणि ऑपरेटरने बोलावले. कटके पोलवर चढण्याआधी त्यांनी विद्युत प्रवाह बंद करण्यास महावितरणच्या कर्मचार्‍यांना सांगितले. ते पोलवर चढले असता त्यांना शॉक लागला व ते पोलवरून खाली कोसळले. या अपघातात त्यांचे दोन्ही हात निकामी झाले. अपघातात जखमी झाल्यास महावितरणच्या कर्मचार्‍यास भरपाई दिली जाते, परंतु कटके हे महावितरणचे कर्मचारी नसल्याने त्यांनी भरपाई मिळावी म्हणून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. सुनावणीवेळी महावितरणने बाजू मांडताना कोर्टाला सांगितले की, कंपनीच्या टेक्निशियन आणि ऑपरेटरने बोलावले असले तरी त्यांना एखाद्या इलेक्ट्रिशियनला अशा कामासाठी पाचारण करण्याचा कोणताही अधिकार नाही. न्यायालयाने मात्र महावितरणचा हा दावा फेटाळून लावत प्रशासनाला खडे बोल सुनावले व याचिकाकर्त्यांना दिलासा देत भरपाई देण्याचे आदेश दिले.

न्यायालय काय म्हणाले

  • कटके या अपघातात अधू झाले असल्यामुळे आपल्या हाताने ते काम करू शकत नाहीत. त्यांच्या रोजंदारीचाही प्रश्न निर्माण झाला आहे.
  • कटके जरी कंपनीचे कर्मचारी नसले तरी त्यांना महावितरणच्या अधिकार्‍यांनी बोलावले होते. त्यामुळे कंपनी आपली जबाबदारी टाळू शकत नाही. म्हणूनच कंपनीने याचिकाकर्त्याला योग्य ती नुकसानभरपाई येत्या चार आठवड्यांत दिलीच पाहिजे.
आपली प्रतिक्रिया द्या