गोठविलेली बँक खाती पुन्हा सुरू करण्यास परवानगी नाकारली

15

सामना ऑनलाईन, मुंबई

आदर्श गृहनिर्माण संस्थेची गोठविण्यात आलेली दोन्ही बँक खाती पुन्हा सुरू करण्याची परवानगी देऊन या खात्यांमार्फत पूर्वीसारखे व्यवहार करण्यास सवलत द्यावी अशी विनंती करणारी आदर्श गृहनिर्माण संस्थेच्या कमिटीची मागणी मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावली. या खात्यांमध्ये जमा केला गेलेला पैसा हा बेनामी व्यवहारातून आलेला असण्याची दाट शक्यता असल्याने ही बँक खाती पुन्हा सुरू करण्याची मुभा देता येणार नाही असे स्पष्ट मतही न्यायालयाने व्यक्त केले. आदर्शप्रकरणी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांसह एकूण १४ आरोपींविरुद्ध जानेवारी २०११ मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याचवेळी सीबीआयने या संस्थेची दोन बँक खाती गोठविली आहेत. या खात्यांमध्ये १ कोटी ४० लाख रुपये जमा असून ते गेल्या सहा-साडेसहा वर्षांपासून या दोन्ही खात्यांमध्ये पडून आहेत. या रकमेचा वापर करण्यास परवानगी मिळावी यासाठी ‘आदर्श’ने सप्टेंबर २०१५मध्ये विशेष सीबीआय न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते; परंतु सीबीआय न्यायालयाने संस्थेची याचिका त्याचवेळी फेटाळून लावली.

आपली प्रतिक्रिया द्या