अपघातातील बळींना जबाबदार कोण?

47

सामना ऑनलाईन । मुंबई

पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गाची चाळण झाली असून वाताहत झालेल्या या महामार्गावरूनच वाहनचालकांना वाट काढत कोकण गाठावे लागत आहे. आदेश देऊनही सरकारने अद्याप या मार्गावरील खड्डे बुजवलेले नाहीत. यावरून हायकोर्टाने आज राज्य सरकारला चांगलेच खडसावले. महामार्गावरील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातात बळी गेलेल्यांच्या घटनेला जबाबदार कोण, असा सवाल करीत न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावले. एवढेच नव्हे तर दोन आठवड्यांत याबाबत उत्तर द्या असे आदेश देत यासंदर्भात प्रतिज्ञापत्र  सादर करण्यास सरकारला बजावले.

मुंबई-गोवा महामार्ग क्रमांक 66 वर दरवर्षीप्रमाणे यंदाही पावसाळय़ात मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पनवेल ते दोडामार्गपर्यंत या महामार्गाची वाताहत झाली आहे. ऍड. ओवीस पेचकर यांनी याचिका दाखल केली असून प्रभारी मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती राजेश केतकर यांच्या खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. सरकारची बाजू मांडणार्‍या ऍड. निशा मेहरा यांनी सांगितले, ‘सरकारने खड्डे बुजवण्याचे काम पूर्ण केले असून त्याची छायाचित्रे व व्हिडीओ पुरावा असून आपण कोर्टात सादर करू शकतो.’ त्यावर न्यायालय संतापले.

…अन्यथा कोर्ट कमिशनर नेमावा लागेल

मुंबई-गोवा महामार्गावरील खड्ड्यांची समस्या अद्यापही कायम असून सरकार मात्र महामार्गावरील सर्व खड्डे बुजवले असल्याचा दावा करीत आहे. जर खोटे बोलत असाल तर कोर्टाला स्वतः खड्डे बुजवले आहेत की नाही त्याची शहानिशा करण्यासाठी कोर्ट कमिशनर नेमावा लागेल असे न्यायालयाने बजावले.

आपली प्रतिक्रिया द्या