‘पंतप्रधान निर्लज्जपणे हसत होते, विनोद करत होते’; मोदींच्या भाषणावर राहुल गांधींची सडकून टीका

लोकसभेत मोदी सरकार विरोधात अविश्वास प्रस्तावादरम्यान मणिपूर हिंसाचारावर चर्चा झाली. मोदी सरकार विरोधातील अविश्वास प्रस्ताव आवाजी मतदानानं फेटाळण्यात आला आहे. दरम्यान, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदेतील भाषणावर सडकून टिका केली आणि म्हटले की ‘पंतप्रधान विनोद करत होते आणि थट्टा करत होते’.

‘काल पंतप्रधान संसदेत सुमारे 2 तास 13 मिनिटे बोलले. शेवटी ते मणिपूरवर 2 मिनिटे बोलले. मणिपूर अनेक महिने जळत आहे, लोक मारले जात आहेत, बलात्कार होत आहेत, पण पंतप्रधान हसत होते. , विनोद करत होते. ते त्यांना शोभत नाही’, असं राहुल गांधी म्हणाले.

नवी दिल्लीत एका पत्रकार परिषदेला संबोधित करताना ते म्हणाले, ‘भारतीय लष्कर दोन दिवसांत हा मूर्खपणा थांबवू शकते, परंतु, पंतप्रधानांना मणिपूर धूमसत ठेवायचं आहे आणि आग विझवायची नाही’.

‘2028 मध्ये अविश्वास प्रस्ताव आणा’ या पंतप्रधानांच्या टीकेला उत्तर देताना राहुल गांधी म्हणाले, ‘2024 मध्ये पंतप्रधान मोदी पंतप्रधान होतील की नाही हा प्रश्न नव्हता, तर मणिपूरचा होता, जिथे मुले आणि लोक मारले जात आहेत’.

‘(पंतप्रधानांचे) भाषण भारताबद्दल नव्हते, ते नरेंद्र मोदींबद्दल होते. ते त्यांचे विचार, त्यांचे राजकारण आणि त्यांच्या महत्त्वाकांक्षांबद्दल बोलत होते. प्रश्न ते 2024 मध्ये पंतप्रधान होण्याचा नाही, प्रश्न हा आहे की मणिपूर जळत आहे’, असं राहुल गांधी म्हणाले.

‘पंतप्रधान किमान मणिपूरला जाऊ शकतात, समुदायांशी बोलू शकतात आणि म्हणू शकतात की मी तुमचा पंतप्रधान आहे, चला बोलूया, परंतु मला कोणताही हेतू दिसत नाही’, असंही ते म्हणाले.

ते पुढे म्हणाले की पंतप्रधानांच्या ‘हातात अनेक साधने’ आहेत, परंतु ते हिंसाचार संपवण्यासाठी त्यांचा वापर करत नाहीत.

‘मणिपूरमध्ये संवाद नाही, मणिपूरमध्ये निव्वळ हिंसाचार होत आहे. पहिली पायरी म्हणजे हिंसाचार थांबवणे आणि त्याला संपवणे. ते काहीही करत नाही आणि फक्त हसत आहेत’, असे राहुल गांधी म्हणाले.

संसदेतील विरोधी पक्षांच्या खासदारांच्या निलंबनावर भाष्य करताना ते म्हणाले, ‘(सरकारने) खासदारांना निलंबित केले तरी आमचं काम, सेवा बदलणार नाही. आमचं काम मणिपूरमधील हिंसाचार थांबवणं हे आहे’.

गुरुवारी संसदेत अविश्वास प्रस्तावाला प्रत्युत्तर देताना पंतप्रधान मोदींनी विरोधकांवर हल्ला चढवला आणि म्हटलं की ‘काँग्रेस जुनेच्या मार्गानं जात आहे. अभ्यास न करता केवळ आरोप करत आहे’. मणिपूरबद्दल ते म्हणाले की, ‘मला मणिपूरच्या जनतेला आश्वस्त करायचे आहे – देश तुमच्या पाठीशी उभा आहे, ही संसद तुमच्या पाठीशी आहे. मणिपूर या संघर्षातून बाहेर पडेल आणि लवकरच विकास आणि प्रगतीच्या मार्गावर कूच करेल. इथे शांततेचा सूर्य पुन्हा उगवेल’.