हेडफोनच्या स्पीकरमध्ये लपला होता कोळी, महिलेने न बघता कानात घातले आणि…

एखादा कीटक आपल्या नेहमीच्या वापराच्या वस्तूंमध्ये जाऊन बसणं, ही तशी सामान्य बाब आहे. मात्र, परदेशात ही बाब तितकी सामान्य नसते. कारण, अनेक देशांमध्ये कीटकांच्या काही घातक प्रजातीही आढळतात. त्यामुळे नेहमीच्या वापराच्या वस्तूही त्यांना तपासून घ्याव्या लागतात. अशीच एक घटना ऑस्ट्रेलियात घडली आहे.

ऑस्ट्रेलियातील ओली थर्स्ट नावाच्या एका महिला प्लंबरसोबत ही घटना घडली. ओली तिचं काहीतरी काम करण्यासाठी घरात वावरत होती. त्यावेळी सहज म्हणून तिने तिचे हेडफोन्स कानाला लावले आणि गाणी ऐकू लागली. मात्र, मोठ्या आकाराच्या कान झाकणाऱ्या स्पीकरमधून तिच्या कानाला हळूच गुदगुल्या होऊ लागल्या. तिने आधी दुर्लक्ष केलं. पण, वारंवार गुदगुल्या होत असल्याने तिने अखेर हेडफोन काढला आणि नीट तपासला. तेव्हा तिला जे दिसलं त्याने तिच्या काळजाचा ठोकाच चुकला.

हेडफोनच्या गोलाकार स्पीकरच्या आत एक मोठा कोळी लपून बसला होता. जेव्हा ओलीने हेडफोन घातले होते, तेव्हा आत ऑक्सिजन न मिळाल्याने कोळी बाहेर यायचा प्रयत्न करत होता. पण, जेव्हा तिने हेडफोन तपासून ते आपटले आणि त्याला बाहेर काढायचा प्रयत्न केला, तेव्हा तो काही बाहेर येईना. सुदैवाने तो कोळी विषारी नव्हता. अन्यथा त्याच्या चाव्याने ओलीच्या जीवावर बेतू शकलं असतं.

या घटनेचा एक व्हिडीओही व्हायरल झाला आहे. व्हायरल व्हिडीओवर अनेक नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया नोंदवल्या आहेत. काहींनी तिला अनेक कीटक मानवासाठी घातक नसल्याचं म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ-

आपली प्रतिक्रिया द्या