भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. बऱ्याचशा भाज्यांच्या सालींमध्ये जीवनसत्त्वांचे गुणधर्म जास्त असतात. ‘रूट-टू-स्टेम’ यामध्ये भाजीचा कोणताही भाग फेकून दिला जात नाही तसेच बऱ्याचदा भाज्यांची देठ, साली कचरा म्हणून फेकून दिली जातात, मात्र या भाज्यांतील या भागांमध्येही जास्त प्रमाणात पोषक तत्त्वे असतात. कांदा आणि लसणाच्या सालीत जीवनसत्त्व ए, सी, ई तसेच फ्लेव्होनॉइड, अँटिऑक्सिडंट आणि दाहकविरोधी गुणधर्म प्रामुख्याने यामध्ये आढळतात. त्यामुळे कांदा-लसणाची साल फेकण्यापूर्वी त्याचा वापर आरोग्यासाठी कसा करता येईल, याविषयी पाहूया.
स्नायूदुखीवर गुणकारी
– कांद्याच्या सालीमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट गुणधर्म स्नायूंच्या क्रॅम्प किंवा स्नायू दुखणे कमी करण्याचे काम करतात. याकरिता 10 ते 20 मिनिटे कांद्याची साल पाण्यात उकळवा नंतर हे पाणी गाळून झोपण्यापूर्वी चहाप्रमाणे प्या.
त्वचेला खाज असेल तर
– कांदा आणि लसूणामध्ये बुरशीविरोधी गुणधर्म असतात. त्वचेला खाज येत असेल तर हा उपाय करू शकता. ऍथलीटच्या पायाला येणाऱ्या खाजेवरही हा उपाय प्रभावी आहे. पाण्यात उकळलेली साल आणि पाणी त्वचेवर लावा. यामुळे खाजेवर आराम मिळेल.
निद्रानाशावर फायदेशीर
कांदा आणि लसणाची साले निद्रानाशात नैसर्गिक उत्तेजक म्हणून काम करतात. जर तुम्हाला झोप येत नसेल किंवा झोप लागून नंतर जाग येणे असे वारंवार होत असेल तर कांदा-लसणीच्या सालींपासून तयार केलेला चहा पिणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते.
दृष्टीदोषावर करा हा उपाय
कांद्याच्या सालीमध्ये जीवनसत्त्व सी आणि ए मुबलक प्रमाणात आढळते. ही दोन्ही जीवनसत्त्वे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाची आहेत. डोळे निरोगी ठेवण्यासाठी कांद्याच्या सालीपासून तयार केलेला चहा घेऊ शकता.
कांद्याच्या सालींचा चहा कसा कराल?
साहित्य –
3 ते 4 मध्यम आकाराच्या कांद्याच्या साली, 2 कप पाणी, 1 चमचा मध
कृती
कांद्याच्या सालींचा चहा तयार करण्यासाठी कांद्याच्या साली पाण्याने स्वच्छ धुवून घ्या. त्यानंतर या सर्व साली पाण्यात घालून उकळा. व्यवस्थित उकळी आल्यावर या पाण्याचा रंग बदलू लागेल. आता हे पाणी गाळणीने गाळून कपात ओता. त्यामध्ये चमचाभर मध घालून प्या.