आल्याचे हे फायदे वाचून थक्क व्हाल! वाचा सविस्तर

घरगुती मसाल्यांच्या यादीतला आलं हा एक महत्त्वाचा घटक आहे. आल्याचा वापर सर्दी आणि खोकल्यावर करता येतो. आल्यामध्ये अनेक पोषक तत्व असून ते आरोग्यवर्धक आहे. पाहुयात आल्याचे काही फायदे-

आलं औषधी गुणधर्म असणारं आहे. यातील फेनोलिकमुळे अपचन तसेच जळजळीवर आराम मिळतो. आलं पित्तशामक, वेदनाशामक, शरीराचे तापमान कमी करणारे आहे. आल्यामुळे तोंडात लाळेची निर्मिती जास्त प्रमाणात होते. त्यामुळे घास गिळायला सोपे जाते.

आलं सर्दी खोकल्यावरील गुणकारी औषध म्हणून प्रसिद्ध आहे. अतिसारावर आल्याच्या रसाचा बेंबीवर लेप करावा. आल्याचा रस व मध सम प्रमाणात बाटलीमध्ये साठवून दोन-दोन चमचे दोन वेळा घेतल्यास सर्दी, खोकला पडसे व स्वरभंग बरे होतात. अजीर्ण झाल्यास आल्याचे रसात लिंबाचा रस व मीठ घालून पाणी प्यावे. आले तोंडात ठेवताच लाळग्रंथी सक्रिय होतात. लाळ पाझरू लागते. आल्याचे सेवनाने पोटात गॅस तयार होत नाही. पोटदुखी व मळमळ थांबण्यास मदत होते.

आले पाचक, सारक व भूक वाढविणारे आहे. पित्ताने चक्कर आली वा मळमळत असेल, शस्त्रक्रियेनंतर उलटीसारखे वाटत असेल तर आल्याचा रस साखर व मिठाबरोबर घ्यावा. सर्दी व कफावर तुळशीच्या पानांबरोबर आल्याचा कीस उकळून प्यावा. सांधेदुखीवर आल्याचा काढा देतात वा एरंडेल तेलाबरोबर सुंठीची चिमूट नियमाने घ्यावी. मधुमेहात मोतीबिंदूचे ऑपरेशन झाले तर नियमितपणे आल्याचा रस घ्यावा.

रक्तातील चरबीची पातळी कमी करण्यासाठी व रक्त पातळ करण्यासाठी आल्याचा उपयोग होतो. ज्यांना पित्ताशयातील खड्यांचा त्रास त्यांनी आले खाऊ नये. आल्यात मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोह व झिंक(अल्प प्रमाणात) आहेत. क, ब3 व ब6 ही जीवनसत्वे आणि फार थोड्या प्रमाणात पिष्टमय पदार्थ आल्यात आहेत. वातहारकही असल्याने जेवणानंतर पोटात गॅस झाला तरी आल्याचे चाटण चाटावे. ते आतड्याची हालचाल वाढविते व पोटातील वेदना कमी करते

आलं व तुळशीचा काढा एकदम गुणकारी. सर्दी, खोकला, ताप, डोकेदुखीवर हा काढा औषधी व रूचकर ठरतो. यात काळ्या तुळशीची पाने, सुंठ पावडर वा किसलेले आले, जेष्ठमध, भाजून कुटलेली अळशी (जवस) चहाच्या पातीचे तुकडे, घालून पाणी अर्धे आटेपर्यंत उकळावे. त्यात गूळ घालून, गाळून हा काढा प्यायला द्यावा.