आळंदीत भाविकांसाठी आरोग्य सेवा तैनात

आषाढी यात्रा प्रस्थान सोहळ्यानिमित्त संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची गर्दी पहाता पुणे जिल्हा परीषदेच्या आरोग्य विभाग, खेड पंचायत समिती तालुका आरोग्य विभाग आणि नगर परिषदेच्या वतीने आळंदी पंचक्रोशीत नागरी आरोग्य सेवा तैनात असल्याचे आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर मंहकाळे यांनी सांगितले.

यासाठी वैद्यकीय सेवा जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली कामकाज करण्यात येत आहे. आळंदीतील भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. बी.बी.गाढवे, डॉ. सुरेश गोरे, डॉ. मंकवी यांनी पथक तैनात केली असल्याची माहिती आरोग्य विस्तार अधिकारी सुधाकर मंहकाळे यांनी दिली.

यामध्ये आळंदी पंचक्रोशीत चारही बाजूने असणाऱ्या परिसरातील 22 विहिरी, 1 सार्वजनिक विहीर, 149 खाजगी बोअरवेल, 9 सार्वजनिक बोअरवेल, 16 सार्वजनिक नळ आदी ठिकाणच्या पिण्याच्या पाण्याचे नमुने तपासण्यास आले आहेत. यामध्ये सर्व संबंधित ठिकाणी ब्लिचिंग पावडर टाकून शुद्धीकरणासाठी तसेच सर्व जलस्त्रोतांचे ओटी टेस्ट दिवसातून दोन, तीन वेळा घेण्यात येत आहेत. दिंडी मार्गावर विविध ठिकाणी पाण्याचे टॅकरची सोय करण्यात आली. या पाण्याचे शुद्धीकरण सह आरोग्य कर्मचारी नेमण्यात आले आहे. याशिवाय हॉटेल, खाद्यपदार्थ उपहारगृहाचे तपासणी करून कचरा विल्हेवाट आणि उघड्यावरील खाद्य पदार्थांसाठी सूचना चालक मालकांना भेटून देण्यात आल्या आहेत. भेटीत कामगारांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली आहे.

आळंदी कार्यक्षेत्र परीसरातील दवाखाने, हॉस्पिटल यांच्यावर आरोग्य कर्मचारी यांच्या मार्फत पर्यवेक्षण करून ओपीडीसह सर्व संदर्भ सेवा देण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. कोणत्या आजारांचे रुग्ण आढळून येत आहे. याची माहिती आरोग्य विभागाला तत्काळ देण्याच्या सूचना वैद्यकीय व्यवस्थापनाला देण्यात आल्या आहेत.

खेड तालुका आरोग्य विभागामार्फत 6 वैद्यकीय पथके वेगवेगळ्या ठिकाणी कार्यरत आहेत. प्राथमिक उपचारासह मोफत औषधे पुरवण्यात येत आहेत. या ठिकाणी कोरोना चाचण्यांचे नमुने घेण्यात येत आहे. यासाठी 6 वैद्यकीय अधिकारी, 30 आरोग्य सेवक, 10 आरोग्य सहाय्यक, 6 आरोग्य सेविका, 6 आरोग्य सहाय्यिका, 5 पर्यवेक्षक, 6 प्रयोगशाळा तंत्रज्ञ, 6 परीचर, 6 रुग्णवाहिकांसह वाहनचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे.