पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान, बीड जिल्ह्यामुळे महाराष्ट्राचा झेंडा

48

सामना प्रतिनिधी । बीड

माता मृत्यू चा दर कमी करण्यासाठी केंद्र सरकारने राबवलेल्या पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियानात बीड जिल्ह्याने केलेल्या नेत्रदीपक कामगीरी मुळे राष्ट्रीय स्थरावरील मानाचा पुरस्कार महाराष्ट्राला मिळाला. दिल्लीत बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अशोक थोरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सकपदी नियुक्ती होताच डॉ अशोक थोरात यांनी जिल्हाभरातील आरोग्य व्यवस्थेचा चेहरा मोहरा बदलण्याचा यशस्वी प्रयन्त केला. आरोग्यमंत्री दिपक सावंत यांनी टाकलेला विश्वास सार्थ ठरवत कामाचा धडाका सुरू केला. त्यांनी बीड जिल्ह्यातील खाजगी डॉक्टरांच्या मदतीने जिल्हाभरात पंतप्रधान सुरक्षित मातृत्व अभियान राबवले. या अभियाना ला मोठे यश मिळाले. बीड जिल्ह्यातील ७० खाजगी रुग्णालयात ८४ खाजगी डॉक्टरांनी २८१० तास काम करून २१ हजार १५१ मातांना आरोग्य सेवा दिली. तर शासकीय आरोग्य यंत्रणा आणि खाजगी डॉक्टर यांनी ४९ हजार गरोदर मातांची तपासणी केली.१५ हजार सहाशे मातांची सोनोग्राफी केली. त्यात रक्ताक्षय आजार असणाऱ्या ५३७, मधुमेह असणाऱ्या ३२४, एडस २९, आणि १ हजार १२ अतिजोखीम असणाऱ्या मातांना विशेष सेवा दिल्यामुळे त्यांचा जीव वाचला. बीड जिल्ह्याच्या या असाधारण कामगिरी मुळे राष्ट्रीय स्थरावर महाराष्ट्राचा झेंडा फडकला. शुक्रवारी दिल्लीत केंद्रीय आरोग्यमंत्री जे पी नड्डा, राज्यमंत्री अश्विनीकुमार चोबे, अनुप्रिया पटेल यांच्या हस्ते आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत आणि बीडचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

हे यश सामूहिक कामगिरीचे-डॉ थोरात
बीड जिल्ह्यामुळे महाराष्ट्राचा जो गौरव झाला त्या यशाचे मानकरी बीड जिल्ह्यातील सर्व आरोग्य यंत्रणा, खासगी संस्था, खासगी डॉक्टर, प्रसिद्धी माध्यम आहेत , अभियान राबवताना दाखवलेली तळमळ आणी परिश्रम या मुळे यश मिळाले. या पुढेही बीड जिल्ह्यात असेच काम पुढे घेऊन जाणार आसल्याचा विश्वास डॉ अशोक थोरात यांनी व्यक्त केला.

आपली प्रतिक्रिया द्या