आरोग्य समस्या नोकरदार स्त्रीच्या

3173

>> डॉ. अविनाश भोंडवे

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी स्त्रियांचे जे आजार सर्वसाधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर दिसू लागायचे तेच विकार घेऊन आज विशीतल्या तरुण मुली दवाखान्याच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. यात पूर्वीच्या त्रासांसमवेत बदलेल्या जीवनशैलीच्या नवनव्या शारीरिक समस्या दिसून येत आहेत.

विसाव्या शतकाच्या उत्तरार्धापासून सर्व क्षेत्रामध्ये स्त्रिया पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून कामे करू लागल्या. त्यामुळे आर्थिक बाबतीत अबला नारीचे सक्षमीकरण झाले. मात्र आज एकविसाव्या शतकातही गृहकृत्यांच्या जबाबदारीतून तिला सुटका मिळालेली नाही. घर आणि नोकरी ही दुहेरी कसरत सांभाळताना तिच्यापुढे शारीरिक आरोग्याबाबत अनेक बिकट समस्या उभ्या राहत जातात.

पंचवीस-तीस वर्षांपूर्वी स्त्रियांचे जे आजार सर्वसाधारणपणे वयाच्या चाळिशीनंतर दिसू लागायचे तेच विकार घेऊन आज विशीतल्या तरुण मुली दवाखान्याच्या पायऱ्या चढताना दिसत आहेत. यात पूर्वीच्या त्रासांसमवेत बदलेल्या जीवनशैलीच्या नवनव्या शारीरिक समस्या दिसून येत आहेत. आजच्या नोकरी करणाऱया स्त्रियांमध्ये दिसून येणाऱ्या या आजारांबाबत काही वर्षांपूर्वी ‘असोसिएटेड चेंबर ऑफ कॉमर्स ऍण्ड इंडस्ट्रीज’ (असोचॅम) यांनी पुणे, मुंबई, अहमदाबाद, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, हैदराबाद, जयपूर, कोलकाता आणि लखनौ या शहरांतील 120 मोठय़ा कंपन्यांत काम करणाऱ्या 2800 स्त्रियांची नमुना चाचणी केली. या पाहणीच्या अहवालानुसार 75 टक्के स्त्रियांमध्ये कुठला ना कुठला तरी गंभीर त्रास आढळून आला. 78 टक्के स्त्रियांमध्ये उच्च रक्तदाब, मधुमेह, लठ्ठपणा, रक्तातील कोलेस्टेरॉलची वाढ, मूत्रपिंडाचे आजार, हृदयरोग असे त्रास होते. 42 टक्के स्त्रियांना त्यांच्या धकाधकीच्या जीवनशैलीमुळे पाठ-कंबरदुखी, निद्रानाश, नैराश्य, चिंता असे आजार आढळून आले. जागतिक आर्थिक मंदीमुळे आपली नोकरी सुटली तर आपल्या पोटावर पाय येईल ही तीव्र भीती या सर्व महिलांमध्ये प्रकर्षाने आढळली. विशेष म्हणजे यापैकी 90 टक्के स्त्रिया आपल्या आजारासाठी कुठलाही वैद्यकीय उपचार नियमितपणे घेत नव्हत्या.

घर सांभाळून नोकरी करणाऱया स्त्रियांमध्ये प्रामुख्याने आढळणारे आजार पाहू गेलो तर त्यांच्यामध्ये 70 टक्क्यांहून अधिक हिंदुस्थानी स्त्रिया ऑनिमियाने पीडित आहेत. नोकरीतील आणि घरातील कामाच्या वेळातील कसरतींमुळे खाण्याच्या वेळा कधीच पाळल्या जात नाहीत. त्यातच चौरस आणि सकस आहाराची तत्त्वे न सांभाळता आल्याने मिळेल ते आणि जमेल तेव्हा खाणे या गोष्टी घडतात. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी होते. अशक्तपणा, दम लागणे ही लक्षणे दिसतात. कामातील वेळांमुळे व्यायाम जमत नाही, बऱ्याचदा फास्टफूड, बाहेरचे चमचमीत आणि तेलाचे चरबीयुक्त पदार्थ, खाण्यात येतात. त्यामुळे अतिरिक्त वजनवाढ होते. विशेषतः कंबरेचा घेर वाढून पोट सुटते. अंगात रक्ताचे प्रमाण कमी आणि वजन मात्र जास्त असा विरोधाभास असलेली शरीरप्रकृती बहुसंख्य स्त्रियांत आढळते.

वाढत्या वजनाची जाणीव या महिलांना झाल्यावर शास्त्रीयरीत्या उपचार न करता त्या फॅड डाएटच्या मागे लागतात. किटो डाएट, लो-कार्ब, इंटरमिटंट फास्टिंग, नो फॅट, नो शुगर अशा प्रकारांनी आकर्षित होतात आणि शरीरप्रकृती आणखीन ढासळून घेतात. वजन कमी करण्याचे आश्वासन देणाऱया संस्थांच्या भुलभुलैयात सापडणाऱ्या गिऱ्हाईकांत नोकरीपेशातल्या महिलाच जास्त सापडतात. वजनवाढ आणि व्यायामाचा अभाव यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, सांधेदुखी हे त्रास प्रामुख्याने आढळतात. तरुण मुलींमध्ये ‘पॉलिसिस्टीक ओव्हेरियन सिंड्रोम’ आढळून येतो. तसेच थायरॉइडचा विकारही आजकाल या स्त्रियांत मोठय़ा प्रमाणात आढळून येऊ लागला आहे.

आहारातील आवश्यक घटकांच्या आणि क्षारांच्या असमतोलामुळे या स्त्रियांच्या आहारात कॅल्शियम आणि ‘ड’ जीवनसत्त्वाची कमतरता निर्माण होते. सूर्यप्रकाशाला पारख्या असल्यामुळे आणि त्यांची हाडे ठिसूळ बनतात. साहजिकच कामातून रिटायर्ड होण्याआधीच कंबरदुखी, पाठदुखी, पायांची तसेच हातांची हाडे दुखणे, मानेच्या मणक्यांचा स्पाँडिलायटिस, मनगटे दुखणे, हातांची बोटे बधिर होणे असे त्रास 70 टक्क्यांहून जास्त स्त्रियांत आढळतात. बँका, कंपनी ऑफिसेस, शाळा-कॉलेजेस आणि कारखान्यात सततचे बैठे काम करणाऱ्या स्त्रियांमध्ये या तक्रारी जास्त प्रमाणात दिसून येतात.

कामातील जबाबदाऱ्या, डेडलाइन्स, उशिरापर्यंत कामे करणे, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील रात्रपाळ्या आणि ताणतणाव यामुळे निद्रानाश, चिंता, नैराश्य, आत्मविश्वास गमावणे अशा विकारांचा प्रादुर्भाव होतो. सध्याच्या स्पर्धेच्या युगात अधिकाधिक जबाबदाऱ्या घेणे, पदोन्नती आणि पगारवाढ या दृष्टीने कामे करताना भविष्यकाळाबाबत मनात एक भीती निर्माण होते. आपण कुटुंबाला आणि विशेषतः मुलांना वेळ देऊ शकत नाही ही भावना त्यांच्या मनात सतत घर करत असते. यातूनच स्वभावदोष आणि भयगंड उद्भवू शकतात. हाती येणारा पैसा, कमावती व्यक्ती असल्यामुळे मिळणारे स्वातंत्र्य आणि तथाकथित पाश्चात्य स्वतंत्र विचारांचा अनाठायी प्रभाव यामुळे काही तरुण मुलींमध्ये व्यसनाधीनता दिसून येते आहे. यात धूम्रपान, मद्यपान आणि नशिल्या औषधांची सवय या गोष्टी वाढत्या प्रमाणात दिसून येऊ लागल्या आहेत. त्यांचे दुष्परिणामही दिसून येऊ लागले आहेत. उच्च शिक्षण पूर्ण करणे आणि त्यानंतर नोकरीतून आर्थिक स्थैर्य मिळवणे यामुळे मुलींची लग्नाची वये तिशीपार जाऊ लागली आहेत. यामुळे वंध्यत्वाची समस्या मोठय़ा प्रमाणात आढळत आहे.

बहुसंख्य वर्किंग विमेन्स सकाळी फक्त चहा-बिस्किटे खाऊन निघतात, दुपारी हॉटेलमधले खाणे, फास्टफूड, जंकफूड यावर भर देतात. खरंतर कामातील थकवा, अशक्तपणा, ऑनिमिया, हाडांचे आजार टाळण्यासाठी योग्य आहार हवा आणि तो दिवसातून दर चार तासांनी, असा चार वेळा थोडा थोडा घ्यावा. सकाळी नाश्त्याला पोहे, उपमा, इडल्या किंवा चहा-चपाती खाल्ली तरी चालेल, पण वर्किंग विमेन्सला नाश्ता करणे नितांत आवश्यकच असते. दुपारी एक चपाती, भाजी, अर्धा वाटी वरणभात, ताक आणि एखादे फळ खावे. सायंकाळी पुन्हा थोडे स्नॅक्स घ्यावेत. रात्री पोळी-भाजी घ्यावी. मांसाहारी स्त्रियांनी आठवडय़ातून किमान एकदा चिकन नक्की खावे. शाकाहारी स्त्रियांनी आहारात सकाळी स्प्राऊटस्, जेवणात उसळी, डाळी यांचा समावेश ठेवावा. कामाच्या वेळा पाळून थोडे व्यायाम करणे गरजेचे असते. सकाळी वेळ काढून दहा मिनिटे सूर्यनमस्कार आणि किमान बसस्टॉपपर्यंत चालणे तरी ठेवावे. आठवडय़ातून तीन दिवस अर्धा तास आणि सुट्टीच्या दिवशी थोडे तासभर चालले तरी बराच व्यायाम होऊ शकतो. मानसिक स्थैर्यासाठी मेडिटेशन, योगासने करणे आवश्यक असते. रोजची झोप किमान सात तास घ्यावी. शिवाय काही छंद जोपासावेत. व्यसने टाळावीत. त्यासाठी विशेष मानसोपचाराचा वापर करावा. अशा गोष्टी केल्या तर बरेच आजार टळू शकतात.

नोकरी आणि व्यवसाय करणाऱ्या स्त्रियांनी वर्षातून दोन वेळा तरी शारीरिक तपासणी करून घ्यावी. कोणत्याही डायग्नोस्टिक सेंटर्सच्या ‘संपूर्ण वैद्यकीय तपासणी’च्या पॅकेजच्या नादी न लागता आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्या वयाला आणि आजारांच्या पूर्वेतिहासाला आवश्यक अशा तपासण्या कराव्यात. वर्किंग विमेन्स त्यांचा संसार तर सांभाळत असतातच. आपण त्यांच्या व्यावसायिक कौशल्याने देशाच्या संपत्तीतही भर टाकत असतात. साहजिकच या महिलांनी आपले आरोग्य निरामय राखले तरच देशाची खरी उन्नती होऊ शकते.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या