शरीराची भाषा

542

>> वरद चव्हाण

डॉ. गिरीश ओक. एकदा आपल्याला आपली शरीराची भाषा समजली की व्यायाम, संतुलित आहार या गोष्टी पूरक ठरतात…

नमस्कार फिटनेस फ्रीक्स! आज माझ्या लेखाच्या सुरुवातीलाच मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छितो. तुम्ही कधी असा विचार केला का, की काय विचार करून देवाने विविध प्रकारची माणसं निर्माण केली असतील? म्हणजे विविध रंगरूपांची, विविध स्वभावाची, विविध शारीरिक उंचीची किंवा विविध शरीरयष्टीची. काहींना व्यायामाची अत्यंत आवड, तर काहींना अजिबात नाही. बरं, एवढंच नव्हे तर काहींचा ‘मेटाबॉलिझम रेट’ चांगला असल्याकारणाने व्यायामाचा परिणाम उत्तम आणि लवकर दिसतो, तर काहींचा ‘मेटाबॉलिझम रेट’ कमी असल्याकारणाने तोच परिणाम दिसायला थोडा वेळ लागतो. आता तुम्हाला वाटत असेल की, या ‘वरद’ला नेमकं झालंय तरी काय? याला एवढे प्रश्न का पडले आहेत? बरं, पडले तर पडले, ते प्रश्न आम्हाला विचारून आमचं का डोकं खातोय? अहो, प्रश्न विचारू नाहीतर काय करू? आजचा आपला सेलिब्रिटीच असा आहे. आजवर अनेक सेलिब्रिटींचे ऍथलेटिक्सचे लेख तुमच्या समोर सादर केले. तुम्ही त्या लेखांना पसंतसुद्धा केलेत. 2-3 तास व्यायामशाळेत घालवणारे, शूटिंग सेटवर व्यायाम करणारे, नृत्यविशारद असणारे, योग करणारे तर काही अत्यंत काटेकोरपणे स्वतःचा आहार सांभाळणारे कलाकार कसे फिट असतात हे तुमच्या समोर सादर केले.

आजचा आपला सेलिब्रिटी कलाकार व्यायाम करतो, पण डाएट करतो, तेही नावाला. बरं, अत्यंत मोजूनमापून काम करत स्वतःला आराम देत काम करत आले आहेत अशातलाही भाग नाही, पण हल्ली जी काही फिटनेसची व्याख्या असेल त्यातली एक तृतीयांशसुद्धा न करता जवळ जवळ 30-40 वर्षे या कलाकारांनी आपल्या मनावर राज्य केलेय. तर आजचे आपले फिटनेसची व्याख्याच बदलणारे कलाकार आहेत डॉ. गिरीश ओक. लहानपणापासूनच त्यांना व्यायामाची फारशी आवड नव्हती, पण गिरीशजींचे बाबा अतिशय शिस्तबद्ध होते. शाळा असो व नसो, गिरीशजींना सकाळी उठून सूर्यनमस्कार, दंड-बैठका, जोर-बैठका मारणे अनिवार्य होतं. व्यायामाचा कंटाळाच असल्यामुळे बाबांचं लक्ष नाही हे बघताच गिरीशजी दम खाऊन घेत असे आणि नुसता व्यायाम करण्याचा आव आणत असत. बाबांनी जरा डोळे वटारले की घाबरून आणि नाइलाज म्हणून व्यायाम करावा लागायचा. व्यायाम केल्याचं बक्षीस मात्र पोटभर नाश्त्याच्या रूपात होत होतं. म्हणूनच बऱ्याच वेळा चांगलं पोटभर खायला मिळावं यासाठी का होईना, पण व्यायाम केला जायचा.

गिरीशजींना मैदानी खेळात मात्र फारच रस होता. मग ते क्रिकेट असो, फुटबॉल असो, खो-खो, कबड्डी, लंगडी, धावण्याची शर्यत, जे म्हणाल त्या खेळामध्ये भाग घेत असत. जेव्हा गिरीशजींनी डॉक्टर व्हायचं ठरवलं. मग मात्र हे खेळ आणि घरचा व्यायाम बाजूला राहिला. सकाळी उठून व्यायाम करण्याच्या जागेवर आता पुस्तकांचा ढिगारा होता. याशिवाय व्यायाम करण्यासाठी म्हणून बाबांनी केलेली झोपमोडीची जागा आता परीक्षेच्या ताणतणावामुळे रात्री उशिरा झोपणं किंवा सकाळी लवकर उठून व्यायामाऐवजी अभ्यास करणं, असा बदल जो प्रत्येक मेडिकल विद्यार्थ्याच्या आयुष्यात येतोच येतो, तसाच त्यांच्या आयुष्यातदेखील आला, पण जेव्हा डॉक्टर ते अभिनेता हा प्रवास सुरू झाला तेव्हा अगदी थोडय़ा प्रमाणात का होईना, पण आपल्या बाबांनी दिलेले व्यायामाचे धडे पुन्हा गिरीशजींच्या आयुष्यात डोकावू लागले आणि त्यांनी घरच्या घरी शक्य होतील ते व्यायाम करायला सुरुवात केली. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे, ती म्हणजे जेव्हा गिरीशजींनी अभिनय करायला सुरुवात केली, त्या काळात खासकरून मराठीत एका अभिनेत्याने फिट असण्याची परंपरा नव्हती. त्यामुळे शूटिंग सेटवर किंवा नाटकांच्या दौऱयांमध्ये व्यायाम, जिम, डाएट याबद्दल चर्चा होत नसे. त्या पिढीने स्वतःला फक्त आणि फक्त अभिनयासाठी वाहून घेतलं होतं असं म्हटलं तरी ते चुकीचं ठरणार नाही. त्या काळात मी कसा दिसतोय? यापेक्षा मी हे वाक्य कसे बोलू या विचारांची ती शेवटची पिढी म्हणावी लागेल. तर त्या काळातले नाटकांचे दौरे आतासारखे 7-8 दिवसांचे नसून 10 ते 20 दिवस असायचे. त्यात नेमका उकाडय़ात विदर्भ दौरा लागला की, मुंबई-पुण्यातल्या कलाकारांना तिकडचा उन्हाळा सहन होत नसे व त्याचा परिणाम प्रत्येकाच्या तब्येतीवर होत असे. याशिवाय प्रयोग रात्रीच असायचे म्हणून रात्री वेळी-अवेळी जेवण होतंच होतं. ‘‘इरेग्युलॅरिटी वॉज अ रेग्युलॅरिटी ऍट दॅट टाइम’’ असं ते म्हणतात. इथे मात्र गिरीशजी स्वतः डॉक्टर असल्याचा फायदा त्यांना होत होता. स्वतःच्या तब्येतीत झालेला थोडा बदल लगेच त्यांना कळायचा आणि ते वाढायच्या आतच त्यावर योग्य तो उपचार केला जात असे. मग अधूनमधून प्राणायाम, चालणं, सायकल चालवणे हे चालूच होतं. आता गिरीशजी लवकरच ‘सिक्स्टीज’च्या क्लबमध्ये पदार्पण करतील, पण आजतागायत त्यांनी एकदाही व्यायामशाळेची पायरी चढलेली नाही. जेवणसुद्धा अगदी घरातूनच नेले पाहिजे असा त्यांचा हट्ट नसतो.

सेटवरचं चमचमीत खाणंसुद्धा ते पसंत करतात, पण एक आहे हां, त्यांनी सुरुवातीपासूनच स्वतःच्या खाण्यावर कंट्रोल ठेवला आहे. अन्न पोटासाठी खावं, जिभेसाठी नाही. एकदा जेवून परत दोन तासांत जर आपल्या समोर जेवणाचं ताट आलं तर ते परत जेवता आले पाहिजे. अर्थात इतकी जागा आपण पोटात ठेवायला हवी अशा मताचे ते आहेत. भाज्यांपासून माशांपर्यंत सर्व काही त्यांना खायला आवडते, पण आज अमुक एका पदार्थावर ‘ताव’ मारूया अशा मताचे ते नाहीत. आजच्या पिढीला गिरीशजी आवर्जून सांगतात की, व्यायामशाळेत जाऊन व्यायाम करा. हरकत नाही! अत्यंत डाएट कॉन्शस रहा, हरकत नाही! पण स्वतःच्या तब्येतीकडे बारीक लक्ष असणे गरजेच आहे. आपण दुर्लक्षित केलेला एक छोटासा आजारसुद्धा आपल्या आयुष्यावरच आघात करू शकतो. काय मग? आता कळलं ना तुम्हाला, मला सुरुवातीला एवढे प्रश्न का पडले होते ते! खरंच, या माणसाने फिटनेसबद्दलचा दृष्टिकोनच बदलला आहे यात शंका नाही.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या