
- डॉ. विक्रांत शहा
तापमानात सातत्याने वाढ होत आहे. हवामान बदलले की, ते अनेक आजारही घेऊन येते. उन्हाळ्यात त्वचा, डोळे, पोटाशी संबंधित समस्या खूप वाढतात. दिवसा कडक उन्हात फिरल्याने उष्माघात, डिहायड्रेशन, डोकेदुखी, त्वचा काळवंडणे यांसारख्या समस्या निर्माण होतात. प्रत्येकाला ऑफिस, शाळा किंवा इतर कोणत्याही महत्त्वाच्या कामानिमित्ताने घराबाहेर पडावे लागते. पाऱ्यातील चढउतार सातत्याने सुरू असल्याचे तसेच मिश्र स्वरूपाचे वातावरण सध्या अनुभवायला मिळत आहे. अशा वातावरणात संसर्गजन्य आजार बळावण्याचे प्रमाण वाढत असल्याने आरोग्यविषयक तक्रारींमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
उन्हाळी सुट्टी आणि प्रवासामुळे बाहेरच्या खाण्याकडे लोकांचा कल वाढता आहे. रस्त्याच्या कडेला मिळणारी शीतपेये, दुधाचे पदार्थ आणि आईस्क्रीम यांचे सेवन जास्त होताना दिसते. काही वेळा हे अन्न दूषित असल्याने उलटय़ा आणि अतिसारासह पोटदुखी यासारखी अन्न विषबाधेची लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे 2 ते 5 दिवसांपर्यंत त्रासदायक असतात. बऱ्याचदा काही रुग्णांना रुग्णालयात दाखल करणे आवश्यक ठरते. पोटाचे विकार टाळण्यासाठी संतुलित आहाराचे सेवन करणे, निरोगी जीवनशैलीचे पालन करणे गरजेचे आहे.
जेव्हा हवामान बदलते तेव्हा व्हायरस आणि बॅक्टेरियाचा संसर्ग वाढतो. त्याचे सर्वात मोठे बळी ठरतात आपली फुप्फुसे आणि पोट. या विषाणूंमुळे जुलाब, उलटय़ा, पोटदुखी, ताप, ऑसिडिटी या समस्यांना सामोरे जावे लागते. हवामानात अचानक झालेल्या बदलामुळे लहान मुले आणि रोगप्रतिकारक शक्ती कमजोर असणाऱ्या व्यक्ती या आजारांना बळी पडतात.
उन्हाळ्यातील आजार आणि संसर्गाची कारणे
पोटाच्या समस्या – दूषित अन्न किंवा पाणी ज्यामध्ये बॅक्टेरिया, विषाणू हे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल समस्यांच्या वाढीस कारणीभूत ठरतात. लहान मुलांमध्ये अतिसार तसेच अन्नातून विषबाधा झाल्याची अनेक उदाहरणे आपल्याला दिसून येतात. उन्हाळ्यात पोटदुखी, गॅसेस, ऑसिडिटी यांसारख्या इतर समस्याही वाढतात.
ताप, खोकला आणि सर्दी – पाच वर्षांखालील मुलांना या समस्या वर्षभर आणि वारंवार होताना दिसतात. बाळांना पौष्टिक आहार देणे तसेच प्रतिकारशक्ती वाढवण्याचा प्रयत्न करणे गरजेचे आहे.
त्वचेचा संसर्ग – उष्ण आणि दमट हवामानामुळे त्वचेवर उष्णतेचे पुरळ उठू शकतात. घामामुळे मुलांच्या शरीरावर पुरळ येतात. शरीरावर लहान पुरळ येऊन खाज सुटण्याची लक्षणे दिसून येतात.
एक्झिमा – लहान मुलांना संपूर्ण शरीरावर खाज सुटून पुरळ उठण्याची समस्या उद्भवू शकते. अॅलर्जीमुळे एक्झिमा होऊ शकतो. उन्हामुळे त्वचा कोरडी पडते आणि त्यामुळे खाज सुटते. जास्त घाम येणे एक्झिमा वाढवू शकतो. तुमच्या मुलाला एक्झिमा असल्यास त्याला थंड पाण्याने शरीर पुसण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून घामाचे प्रमाण कमी होईल. तसेच घामामुळे येणारा चिकटपणा नाहीसा होईल. डॉक्टरांनी शिफारस केलेले मॉइश्चरायझर वापरा आणि मुलांसाठी सुती कपडय़ांचा वापर करा.
सनबर्न – सूर्याच्या हानीकारक अतिनील किरणांमुळे त्वचा काळवंडते. ती भाजली जाऊन त्वचेची जळजळ होऊ शकते. त्यासाठी सनस्क्रीनचा वापर करा.
डिहायड्रेशन – अनेकदा मुले खेळण्याच्या नादात पाणी प्यायला विसरतात आणि त्यामुळे शरीरात डिहायड्रेशन होते. म्हणून मुलांना हायड्रेटेड ठेवण्याचा प्रयत्न करा.
उन्हाळ्यात घ्यायची काळजी
- ताजे व गरम अन्न सेवन करा.
- आहारात पालेभाज्या, फळांचा समावेश करा.
- शिळे, तळलेले पदार्थ खाणे टाळा. उकळून थंड केलेले पाणी प्या.
- दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्या. याशिवाय रस, दही, दूध, ताक, लस्सी, लिंबूपाणी यांचेही सेवन करा.
- नियमित व्यायाम करा. प्राणायाम तसेच मेडिटेशन करून तणावापासून दूर रहा.
- पुरेशी झोप घ्या.
- आरोग्यविषयी कोणतीही तक्रार जाणवल्यास ती अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला घ्या.
- कोणत्याही आजारावर घरगुती उपाय करणे टाळा.
(चेंबूर येथील झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल येथे जनरल फिजिशियन आणि संसर्गजन्य रोग तज्ञ आहेत)