मुंबईकरांचा पारा चढला!

सामना ऑनलाईन । मुंबई

गेले दोन ते तीन दिवस ३० ते ३५ च्या दरम्यान असणारा पारा शनिवारी ३३ पर्यंत खाली घसरला. असे असले तरीही निरभ्र आकाश, तब्बल ९१ टक्के आर्द्रता आणि गरम वारे यामुळे हैराण झालेल्या मुंबईकरांचा पारा चांगलाच चढला आहे. येत्या दोन दिवसांत तापमापकातील पारा चढण्याचीच शक्यता अधिक असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ वैज्ञानिक के. श्रीवास्तव यांनी सांगितले.

मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच तापमानाचा कहर जाणवत आहे. यापुढचे दोन महिने उन्हाची काहिली आणखी वाढेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे मार्च ते मे महिना प्रचंड उकाड्याचा असणार आहे. गेल्या काही दिवसांत कोकण किनारपट्टी वगळता मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडय़ात सरासरी तापमानात ५ डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त वाढ झाली आहे.