विदर्भात उष्णतेच्या लाटेचे थैमान, 3 दिवसांत नागपुरात उष्माघाताचे 4 बळी

गेल्या काही दिवसांपासून विदर्भात उष्णतेच्या लाटेने थैमान घातले आहे. नागपुरातील तापमानाचा पाराही चढाच आहे. उष्णतेच्या लाटेने नागपुरात गेल्या तीन दिवसांत तब्बल चारजणांचा बळी घेतल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. रस्त्यावर बेशुद्धावस्थेत सापडलेल्या 4 व्यक्तींना रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना डॉक्टरांकडून मृत घोषित करण्यात आले. या चौघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाला आहे का, असा संशय निर्माण झाला आहे.

सध्या नागपुरातील तापमानाचा पारा 45 अंशांवर आहे. प्रशासनाकडूनही वारंवार काळजी घेण्याचे आवाहन नागपूरकरांना केले जात आहे. गेल्या तीन दिवसांत नागपूर शहरातील विविध भागात चार अनोळखी व्यक्ती रस्त्यावर बेशुद्धावस्थेत आढळल्या होत्या. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या चौघांचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचा संशय निर्माण झाला आहे. त्यामुळे संपूर्ण नागपुरात भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या 10 दिवसांत नागपुरात कमालीची तापमान वाढ झाल्याचे आढळून आले आहे. नागपुरातील वाढलेल्या पाऱयामुळे अंगाची लाहीलाही झाली आहे. उष्णतेच्या लाटेमुळे आरोग्याच्या इतरही समस्यांचा सर्वसामान्यांना सामना करावा लागत आहे.