मेट्रोच्या आवाजाने मुंबईचं डोकं उठलंय!

28

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईत मेट्रोची कामे युद्धपातळीवर सुरू असून मेट्रोच्या कामाचा मनस्ताप मुंबईकरांना सोसावा लागत आहे. त्यातच कमाल मर्यादेपेक्षा मेट्रोच्या कामांचा आवाज वाढला असून मुंबईकर यामुळे हैराण झाले आहेत. वाढत्या ध्वनिप्रदूषणाची दखल घेऊन मुंबई उच्च न्यायालयाने कफ परेड, चर्चगेट आणि माहीम येथील मेट्रोच्या आवाजाची पातळी तपासण्याचे आदेश पोलिसांना दिले आहेत. तसेच याप्रकरणी संबंधित दोषींवर काय कारवाई करणार त्याची माहिती कोर्टात सादर करण्यासही पोलिसांना खंडपीठाने बजावले आहे.

राज्यातील ध्वनिप्रदूषणासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात विविध याचिका दाखल असून या याचिकांवर न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. कुलाबा ते सीप्झ या मेट्रो-तीनच्या कामामुळे मुंबईत मोठय़ा प्रमाणावर ध्वनिप्रदूषण होत असल्याचे याचिकाकर्त्या सुमैरा अब्दुलानी यांनी खंडपीठाला सांगितले. यासाठी कफ परेड, चर्चगेट आणि माहीम येथील मेट्रोच्या कामांजवळ आवाजाची पातळी तपासण्यात आल्याचे त्यांनी खंडपीठाला सांगितले. न्यायमूर्तींनी याची दखल घेऊन संबंधित स्थळांची पाहणी करून आवाजाची पातळी तपासण्याचे आदेश पोलिसांना दिले. तसेच बुधवारी याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्यासही पोलिसांना हायकोर्टाने बजावले.

पोलीस ठाण्यांत महिनाभरात परिपत्रक
ध्वनिप्रदूषणाची तक्रार करणाऱयांची माहिती आयोजकांना पोहोचत असल्याची माहिती मिळाल्यानंतर खंडपीठाने राज्य सरकारला याचा जाब विचारला होता. त्यावेळी तक्रारदारांची नावे गुप्त ठेवण्यासंदर्भात सर्व पोलीस ठाण्यांत महिनाभरात परिपत्रक पाठवू अशी कबुली राज्य सरकारच्या वतीने आज देण्यात आली. यासंदर्भातील प्रतिज्ञापत्र हायकोर्टात आज राज्य सरकारने सादर केले.

आपली प्रतिक्रिया द्या