नगरकरांना दुसऱ्या दिवशीही पावसाने झोडपले, सीनेला पूर; कल्याण रस्ता पाण्याखाली

मुसळधार पावसाने गुरुवारी रात्री सलग दुसऱ्या दिवशी नगर शहराला चांगलेच झोडपले. सावेडीत 4 इंच (96.3 मि.मी.) एवढा पाऊस पडला. नालेगावमध्ये 32.8, केडगावला 49, तर नागापूरमध्ये 64.8 मि.मी. पावसाची नोंद झाली. या पावसाने सीना नदीला मोठय़ा प्रमाणात पूर आला होता. तसेच संपूर्ण कल्याण रस्ता पाण्याखाली गेला होता. त्यामुळे वाहतूक व्यवस्था खोळंबली होती.

पावसाळा सुरू झाल्यानंतर शहरात बुधवारी रात्री पहिलाच मुसळधार पाऊस पडला. या पावसाने सर्वत्र दाणादाण उडाली असतानाच, गुरुवारी रात्री पुन्हा जोरदार पावसाने हजेरी लावली. रात्री 10 ते 11 या कालावधीत धो-धो पाऊस पडला. त्यानंतर पाऊस काही प्रमाणात कमी झाला. हा पाऊस पहाटेपर्यंत सुरू होता. जोरदार झालेल्या पावसाने सीना नदीला पूर आला होता. कल्याण रस्त्यावर गुडघ्यापर्यंत पाणी साचले होते. पुराचे हे पाणी अमरधामपर्यंत आले होते. त्यामुळे या भागातील नागरिकांचे चांगलेच हाल झाले. पाण्याचा निचरा होईपर्यंत येथील वाहतूक ठप्प झाली होती.

नगर-मनमाड महामार्गावर सावेडीतील कॉटेज कॉर्नरजवळ महामार्गाला तळ्याचे स्वरूप आले होते. त्यावरून वाहने चालविताना वाहनचालकांना तारेवरची कसरत करावी लागली. बुधवारच्या पावसाने मनपाच्या आपत्तिव्यवस्थापनाचे पितळ उघडे पाडले होते. या पावसाने गुलमोहर रस्त्यावरील नरहरीनगरमधील घरांमध्ये पाणी शिरले होते, तर काही ठाकणी झाडे उन्मळून पडली होती. गुरुवारी रात्री झालेल्या पावसाने शहरातील सर्वच रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक ठिकाणी पाणी तुंबण्याचे प्रकार घडले. नाले-गटारांची साफसफाई न झाल्याने ठिकठिकाणी पावसाचे पाणी तुंबल्याचे पाहायला मिळाले आहे. तसेच जोरदार पावसाने शहर व उपनगरातील रस्त्यांवरील खडी वाहून गेल्याने खड्डेच खड्डे पडले आहेत.

जोरदार झालेल्या पावसामुळे नगर शहरातून वाहणाऱया सीना नदीला पूर आला. कल्याण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक ठप्प झाली. सीना नदीचे उगमस्थान असलेल्या जेऊर भागातही जोरदार पाऊस झाला. तसेच नगर शहरात झालेल्या जोरदार पावसाचे पाणी सीनेला जाऊन मिळाले. त्यामुळे सीनेची पातळी वाढत गेली. कल्याण रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेला असून, शुक्रवारी दुपारी उशिरापर्यंत पाणी ओसरलेले नव्हते. त्यामुळे कल्याणच्या दिशेने जाणारी सर्व वाहतूक पुणे रस्त्याने, बाह्यवळण रस्त्याने वळविण्यात आली होती. नदीमध्ये असलेली अतिक्रमणे, वीटभट्टय़ा आदींमुळे पाण्याचा प्रवाह बदलला. त्यामुळे नदीकाठच्या वस्त्यांना याचा फटका बसला. नागापूर, धर्माधिकारीमळा, कल्याण रस्ता परिसर, वारुळाचा मारुती, आगरकरमळा आदी भागांतील नदीकाठच्या रहिवाशांना याचा त्रास सहन करावा लागला. पूररेषेत बदल करण्याचा विषय ऐरणीवर असतानाच, पुराने आपले अस्तित्व दाखवून दिले. त्यामुळे हा विषय पुढील काही काळ तरी बासनात गुंडाळला जाण्याची शक्यता आहे.

आठ मंडळांमध्ये अतिवृष्टी

जिल्ह्यात अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आठ महसूल मंडळांत 60 मिलिमीटरपेक्षा अधिक पावसाची नोंद झाली आहे. यात राहुरी तालुक्यातील वांबोरी महसूल मंडळात दोन ते तीन तासांत 103 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. दरम्यान, हवामान विभागाने पुढील दोन दिवस नगरसह राज्यातील अन्य जिल्ह्यांत दमदार पावसाचा अंदाज वर्तविला आहे.