रत्नागिरीत पूर – महामार्गवरील वाहतूक ठप्प; शेती,घरे पाण्याखाली

930

रत्नागिरी जिल्ह्यात सुरु असलेल्या संततधार पावसाने जवळपास सर्वच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. बावनदी,काजळी नदीला पूर आला असून निवळी, बावनदी, तोणदे, सोमेश्वर, चांदेराई परिसरात पुराचे पाणी शिरून शेती, दुकाने आणि घरांचे प्रचंड नुकसान झाले आहे. बावनदीला पूर आल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे.

बावनदीला पूर आल्याने निवळी परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून भातशेतीचे नुकसान झाले. स्थानिक पंचायत समिती सदस्या साक्षी रावणंग यांनी पूरस्थितीची पहाणी केली.

सोमेश्वर,तोणदे,चांदेराईचा संपर्क तुटला

काजळी नदीला आलेल्या पुरामुळे सोमेश्वर,चांदेराई,हरचेरी,चिंचखरी आणि तोणदे गावांचा संपर्क तुटला आहे. तोणदे,सोमेश्वरातील काही घरे पाण्याखाली गेली असून अनेकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. चांदेराई बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे.

जिल्हयात संततधार सुरुच असून गेल्या 24 तासात 9 पैकी 7 तालुक्यात अतिवृष्टीची नोंद झाली. जिल्हयात आज सकाळपर्यंत एकूण वार्षिक सरासरीच्या 45 टक्के पाऊस झालेला आहे. आज सकाळी 08 वाजता संपलेल्या 24 तासात सरासरी 87.68 मिमी. पाऊसाची नोंद झाली.मंडणगड 92.30 मिमी, दापोली 45.00 मिमी, खेड 54.80 मिमी, गुहागर 94.70 मिमी, चिपळूण 96.40 मिमी, संगमेश्वर 132.70 मिमी, रत्नागिरी 112.50 मिमी, राजापूर 82.90 मिमी, लांजा 77.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या