संगमेश्वर येथे झाड कोसळून महामार्ग ठप्प, वाहनांचे नुकसान

576

संगमेश्वर तालुक्यात आज सकाळपासून पावसाचा जोर चांगलाच वाढला असून पावसाबरोबरच असलेल्या वाऱ्यामुळे संगमेश्वर येथे एक फणसाचे झाड उन्मळून पडल्याने महावितरणचे तीन पोल कोलमडून पडले आहेत. झाड रस्त्यावर पडल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक गेले दीड तास ठप्प पडली आहे. यामध्ये रस्त्याच्याकडेला असलेल्या एका रिक्षेचेही मोठे नुकसान झाले आहे.

पावसाच्या संततधारेबरोबरच मधूनच वारे वाहत असल्याने संगमेश्वर येथे मुंबई गोवा महामार्गालगत असणारे एक फणसाचे मोठे झाड अचानक उन्मळून पडले. हे झाड प्रथम वीज वाहिन्यांवर पडल्याने महावितरणचे तीन विद्युत पोल आणि वीज वाहिन्या तुटून पडल्या. पोल वाकतांना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका रिक्षेवर आल्याने या रिक्षेचे देखील मोठे नुकसान झाले आहे.

गेला दीड तास झाड रस्त्यावर असल्याने मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक संगमेश्वर येथे दोन्ही बाजूंनी ठप्प झाली आहे. कामगारांची कमतरता असल्याने झाड बाजूला करण्याचे काम धीम्या गतीने सुरु आहे. पावसाळ्यात महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीने सतर्क रहावे अशी मागणी वाहनचालकांनी केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या