खेडमध्ये पावसाचे थैमान, नारिंगी आणि जगबुडी नदीला पूर, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचा इशारा

खेड तालुक्यात पावसाची संततधार सुरूच असून खेड शहरालगत वाहणाऱ्या जगबुडी आणि नारिंगी या दोन्ही नद्या धोका पातळी ओलांडून वाहू लागल्या आहेत. जगबुडी नदीचे पाणी मटण मच्छी मार्केट येथून शहराकडे उसळी मारू लागले आहे, तर दापोली मार्गावरील नारिंगी नदीचे पाणी सुर्वे इंजिनिअरिंगजवळ रस्त्यावर आल्याने खेड-दापोली मार्ग वाहतुकीस बंद झाला आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला, तर या दोन्ही नद्यांच्या पाण्याचा वेढा खेडच्या बाजारपेठेला पडणार असल्याने व्यापारी व शहरातील नागरिकांची चिंता वाढली आहे.

गेल्या काही दिवसांच्या विश्रांतीनंतर कमबॅक केलेल्या पावसाने तालुक्यात चांगलेच थैमान घातले आहे. धुवाधार पावसामुळे नद्या नाले, दुथडी भरून वाहू लागले आहेत. शहरी भागासह ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांना घराबाहेर पडणेही अशक्य झाले आहे. शहरातदेखील तशीच परिस्थिती निर्माण झाली आहे. नारिंगी आणि जगबुडी नद्यांचे पाणी कधीही शहरात घुसण्याची शक्यता निर्माण झाल्याने व्यापारी हवालदिल झाले आहेत. 2005 आणि गतवर्षीच्या महापूराचा अनुभव असल्याने व्यापारी कोणीताही धोका पत्करायला तयार नाहीत. नारिंगी आणि जगबुडीच्या पाण्यात वाढ होऊ लागताच व्यापाऱ्यांनी दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलवण्यास सुरुवात केली आहे. नगर परिषदेनेही सायरन वाजवून नागिरकांना धोक्याचा इशारा दिला आहे.

खेड दापोली मार्गावरील नारिंगी नदीच्या पाणी पातळीत दुपारपासून कमालीची वाढ झाली आहे. नारिंगी नदीने नदीकाठची सारी शेती आपल्या कवेत घेऊन खेड दापोली मार्गावर प्रवेश केला आहे. दुपारी अडीच तीन च्या दरम्यान हा मार्ग पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक बंद करावी लागली त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्यावर या मार्गावरील वाहतूक शिवतर रोड मार्गे खेड अशी वळविण्यात आली आहे.

खेड-दापोली मार्गावरील नारिंगी आणि जगबुडी या दोन्ही नद्या धोकादायक पातळी ओलांडून वाहू लागल्याने नगरपालिका प्रशासन सतर्क झाले आहे. दुर्दैवाने खेड शहरात पूरसदृश परिस्थिती निर्माण झालीच, तर पूर्वपरिस्थितीचा सामना करण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन टीम सज्ज आहे. फायबरच्या बोटी, दोरखंड, लाईफ जॅकेट आदी आपत्ती निवारण साहित्य तैनात ठेवण्यात आले आहे. नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन तालुका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

मुसळधार पावसाचा फटका ग्रामीण भागालाही बसला आहे. पावसामुळे काही ठिकाणी पडझड झाल्याचे वृत्त आहे, मात्र ग्रामीण भागात कुठे काय घडले आहे, किती नुकसान झाले याचा तपशील अद्याप उपलब्ध झालेला नाही, मात्र ग्रामीण भागात पावसाचा जोर पाहता नागिरकांनी खबरदारी घेण्याच्या सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या आहेत.

खेड तालुक्यातील बहुतांशी गावे डोंगराच्या पायथ्याशी वसलेली आहेत. पावसाळ्यात डोंगर कोसळून दुर्घटना घडण्याची शक्यता अधिक असते. गतवर्षीच्या अतिवृष्टीत धामनंद येथे डोंगर वस्तीवर कोसळून 16 जणांना आपला जीव गमवावा लागला होता, तर कळंबणी येथे देखील घरावर दरड कोसळून दोघांचा मृत्य झाला होता. अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी डोंगराच्या पायाथ्याशी वस्ती असलेल्या नागरिकांनी सुरक्षेचा उपाय म्हणून तात्पुरते स्थलांतर करून सुरक्षित जागेचा आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.