समुद्र खवळला; किनारपट्टीला लाटांचा तडाखा

38

सामना प्रतिनिधी । मालवण

मान्सूनने कोकणात जोर पकडला आहे. समुद्रही खवळला असुन किनारपट्टीवर लाटांचा तडाखा बसत आहे. दोन दिवस समुद्राला उधाणसदृश स्थिती दिसून आली. सोमवारी दिवसभर पावसाचा व वाऱ्याचा जोर होता. मालवणमध्ये आतापर्यंत ६६७ मीमी. पावसाची नोंद करण्यात आली आहे.

मालवण किनारपट्टीवर सोमवारी सकाळी समुद्राची पातळी वाढल्याचे चित्र होते. मालवण बंदर जेटी नजीकच्या किनाऱ्यावर भरलेल्या आठवडा बाजारात समुद्राच्या लाटांनी संरक्षक बंधारा पार करीत धडक दिली. यामुळे संपूर्ण बाजारात पाणी घुसल्याने व्यापारी व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. यात किनाऱ्यालगत बसलेल्या व्यापाऱ्यांच्या मालाचे मोठे नुकसान झाले.

मालवणसह दांडी, रॉक गार्डन या किनारपट्टीवर खवळलेल्या समुद्राच्या लाटा जोरदारपणे धडकत होत्या. रॉक गार्डन परिसरातील खडकाळ भागात उसळत्या लाटांचा आनंद लुटण्यासाठी उत्साही व्यक्तींनी गर्दी केली होती. लाटांचा जोर वाढल्यामुळे पारंपरिक पद्धतीची मासेमारीची बंद आहे. येत्या काही दिवसात पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या