पुण्यात पावसाची जोरदार हजेरी

21
पुण्यामध्ये पावसामुळे रस्त्यावर पाणी साचले होते फोटो - चंद्रकांत पालकर

सामना प्रतिनिधी । पुणे

पुणे शहर, जिल्ह्यासह शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील धरणांमध्ये मंगळवारी पहाटेपासूनच मुसळधार पाऊस सुरू आहे. शहरात सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत १८.७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. दमदार पावसामुळे खडकवासला धरणातून पाणी सोडल्याने मुठा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. शहर आणि जिल्ह्यात पहाटेपासून दणक्यात पावसाला सुरुवात झाली. पावसामुळे शहरातील वाहतुक कोलमडली. रस्त्यावर वाहणाऱ्या पाण्यामुळे वाहने धिम्या गतीने धावत होती. बाजारपेठांमधील व्यवहारही ठप्प झाले होते. पावसामुळे नागरिकांनी कामाशिवाय घराबाहेर पडणे टाळले. सायंकाळी विद्यार्थी आणि नोकरदारांना भिजतच घरी जावे लागले.

pune-rain

खडकवासला धरणाच्या परिसरात २६ मिलिमीटर, पानशेत ३१ मिलिमीटर, वरसगाव ३२, तर टेमघर धरण क्षेत्रात १८ मिलिमीटर पाऊस पडला. धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून, चार धरणात २७.४९ टीएमसी (९४.२८ टक्के) पाणीसाठा झाला आहे. पानशेत, वरसगाव आणि खडकवासला ही तीन धरणे भरल्याने पाणी सोडण्यात येत आहे. मंगळवारी सांयकाळी चार वाजता खडकवासल्यातून सांडव्यातून २ हजार ५६८ क्युसेस, कालवा १ हजार ५ क्युसेस आणि आणि बंद पाईप लाईनमधून २९८ असे एकुण सुमारे ३ हजार ८७१ क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले. पानेशत वरसगावसह जिल्ह्यातील घोड धणातूनही पाण्याचा विसर्ग सुरू असल्याचे पाटबंधारे खात्यातर्फे सांगण्यात आले.

आपली प्रतिक्रिया द्या