जिल्ह्यात पावसाचा कहर, गुहागर तालुक्याला सर्वाधिक फटका

मुसळधार पावसाने रत्नागिरी जिल्ह्याला झोडपून काढले आहे. रस्ते, परिसर जलमय झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. जिल्ह्यातील जगबुडी नदी, वशिष्ठी नदी आणि काजळी नदी इशारा पातळी सोडून वाहत आहेत. पावसाचा गुहागर तालुक्याला मोठा फटका बसला असून कोतळूक कासारी नदी प्रथमच पात्र सोडून वाहत असल्याने आजूबाजूच्या शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.

मुसळधार पावसात गुहागर तालुक्यातील साखरी त्रिशूळ येथे दरड कोसळली असून वाहतूक ठप्प झाली. असगोली परिसरातील शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरल्याने शेतीचे नुकसान झाले आहे तसेच असगोलीपुलावरून पाणी वाहत होते. शृंगारतळी येथील मुख्य बाजारपेठेत पाणी शिरल्याने दुकानदारांचे नुकसान झाले आहे. आरे गावातील घरांमध्ये पाणी शिरून नुकसान झाले आहे. रत्नागिरी तालुक्यात भंडारपुळे-मालगुंड दरम्यानच्या पुलावरून पाणी वाहत असल्याने पुलावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. संगमेश्वर तालुक्यात कासे-पुर्ये तर्फे सावर्डे येथे दरड कोसळली. आज दिवसभर पावसाने जिल्ह्याला झोडपून काढले असून पावसाचा हा जोर 9 ऑगस्टपर्यंत कायम रहाणार आहे. खेड तालुक्यातील जगबुडी नदी, चिपळूण तालुक्यातील वशिष्ठी नदी आणि लांजा येथील काजळी नदी इशारा पातळी सोडून वाहत आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 83.33 मिमी पाऊस पडला आहे.