ठाणे, रायगडात पावसाची गटारी

23

सामना प्रतिनिधी । ठाणे

अधूनमधून विश्रांती घेत पावसाची ठाणे, रायगड जिल्ह्यात जोरदार गटारी सुरू आहे. ठाण्यात चोवीस तासांमध्ये पावसाने गेल्या वर्षीची सरासरी ओलांडली असून जिल्ह्याला पाणीपुरवठा करणारे बारवी धरणही ९२ टक्के भरले आहे. सखल भागांमध्ये पाणी साचण्याच्या तुरळक घटना सोडल्या तर कुठेही दुर्घटना घडल्या नाहीत. दरम्यान वसई परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे २० गावांचा संपर्क तुटला असून भातशेती पाण्यात गेली आहे.

ठाणे जिह्यात २४ तासांमध्ये १७३०.५० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी या तारखेला १२८३.६३ मिलिमीटर पावसाची नोंद होती. सर्वाधिक १८१८ मिलिमीटर पाऊस भिवंडीत झाला असून ठाणे, कल्याण, मुरबाड, उल्हासनगरमध्येही जोरदार पाऊस पडल्याची माहिती ठाणे जिल्हा प्रशासनाने दिली आहे.

बारवी धरण क्षेत्रातही पावसाचा जोर कायम असल्याने परिसरातील गाववाडय़ांमध्ये पाणी साचले होते. ठाणे शहरात पावसामुळे २२ झाडे उन्मळून पडली आहेत. याशिवाय पाच ठिकाणी पाणी साचल्याच्या तक्रारी आपत्ती निवारण कक्षाकडे आल्या होत्या. वसईच्या पश्चिम पट्ट्यातील शहरी भागातही पावसाचा मोठा फटका जाणवला. तुळजा भवानी मंदिराजवळील मुख्य रस्त्यावर दोन फूट पाणी साचल्यामुळे तो वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला.

-कर्जत तालुक्यातील शिरसे येथील जनार्दन भोईर यांचा गुरांचा गोठा सकाळी पावसामुळे कोसळला. यामध्ये जनार्दन व पुतण्या सुखरूप बाहेर पडले पण त्यांची पत्नी गंभीर जखमी झाली. तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले तर गोठय़ातील तीन म्हशी या दुर्घटनेत मृत्युमुखी पडल्या.

-खालापूर, खोपोली, रसायनी, वावोशी या तालुक्यांतील महत्त्वाच्या ठिकाणी पावसाचा जोर कायम आहे. खोपोलीच्या काटरंग, मोगलवाडी, भानवज या भागांत पाणी साचल्याने घरात पाणी शिरले.

आपली प्रतिक्रिया द्या