ठाणे, रायगडसह कोकणात पावसाचे धुमशान

सामना ऑनलाईन। मुंबई

सोमवारपासून राज्यात दमदार पाऊस पडत असून, मुंबई-ठाणेप्रमाणेच कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिह्यात मुसळधार पाउस पडला. सोमवारी रात्रीपासून सुरू असलेल्या पावसाने नद्यांची पातळी वाढल्याने पुलावरून पाणी वाहू लागल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला. ठाणे, रायगडात अक्षरशः तुफानच आले. ठाण्यातील वालधुनी, उल्हास, काळू आणि रायगडातील पाताळगंगा, गाढी, अंबा, कुंडलिका, गांधारी, सावित्री नद्यांना पूर आल्याने जनजीवन पुरते ठप्प झाले. झाडे कोसळली, विजेच्या तारा तुटल्या. त्यामुळे अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला. पुराचे पाणी वाढू लागल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आसरा घेतला. या पावसाने लोकल सेवा पुरती कोलमडलीच, पण रस्ते वाहतुकीचेही तीन-तेरा वाजले.  गोव्यात तुरळक ठिकाणी अतिवृष्टी झाली, तर मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार, तर मराठवाडा आणि विदर्भात दमदार पाऊस झाला. हवामान खात्याने पुढील २४ तास हाय अॅलर्टचा इशारा दिल्याने लोकांमध्ये पावसाची दहशत निर्माण झाली आहे.

दोन दिवसांपासून मुक्काम ठोकलेल्या पावसाने रौद्र रूप धारण करत सोमवारी रात्रीपासून ठाणे, रायगड जिल्हय़ाला अक्षरशः झोडपून काढले. रात्रभर मुसळधार बरसल्यानंतरही मंगळवारी दिवसभर नॉनस्टॉप पावसाच्या जोरदार सरी कोसळत होत्या. शहरातील वंदना सिनेमासह अनेक ठिकाणी सखल भागांमध्ये पाणी साचले तर शहरातील उपवनसह सर्व तलाव ओसंडून वाहू लागले. काही ठिकाणी झाडे कोसळण्याच्या तुरळक घटना घडल्या. सुदैवाने कोणतीही दुर्घटना घडली नसली तरी जनजीवन पूर्णपणे कोलमडून गेले. मुंबईत लोकलसेवा ठप्प झाल्याचा फटका ठाण्यालाही बसला. त्यातच दुरांतो एक्प्रेसचे आसनगाव येथे डब्बे घसरल्यामुळे ठाणे ते कसारा, कर्जतपर्यंतची लोकलसेवा पूर्णपणे कोलमडली. अनेक लोकल गाडय़ा ठाणे स्थानकातच रद्द करण्यात आल्याने चाकरमान्यांची चांगलीच दैना उडाली.

लोकलसेवा कोलमडल्याचा फटका शहरातील वाहतूक व्यवस्थेवरही पडला. मुंबई-नाशिक, मुंबई-पुणे तसेच मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक अत्यंत धीम्या गतीने पुढे सरकत असल्यामुळे रस्त्यावर जणू गाडय़ांचा पूर आल्याचे चित्र दिसत होते.

वसईतील अकलोली येथे तानसा नदीला पूर आल्यामुळे नदीकाठच्या २५ घरांमध्ये ७ ते ८ फूट पाणी शिरले. नदीकिनारी असलेली ७ गरम पाण्याची कुंड पाण्याखाली गेली. तर गणेशपुरी येथील नित्यानंद कॉलनीतही पुराचे पाणी घुसल्याने  ७० ते ८० घरांना फटका बसला आहे. तानसा पूलही पाण्याखाली गेल्यामुळे दुपारपर्यंत इतर गावांशी संपर्क तुटला होता. रस्ता पाण्याखाली गेल्यामुळे बसेस बंद आहेत.

विरार महानगरपालिका तसेच पालघर जिल्हय़ातील तारापूर औद्योगिक वसाहत, तारापूर अणुविद्युत केंद्र, बोईसरमधील नागरी वसाहतीमध्ये अनेक भागांत पाणीपुरवठा करणारे सूर्या प्रकल्पाचे धामणी धरण शंभर टक्के भरले. धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले असून ६००० क्युसेक पाण्याचा विसर्ग सूर्या नदीद्वारे होत आहे. त्यामुळे सूर्या नदीच्या आजूबाजूच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

ठाणे – तानसा परिसरात 195 मिलिमीटर पाऊस झाला. यावेळी धरणाचे ३८ दरवाजे स्वयंचलित पद्धतीने उघडण्यात आले होते. मात्र आता सध्या १६ दरवाजे उघडे असून उर्वरित बंद आहेत, असे सहाय्यक अभियंता यांनी सांगितले. तसेच कोणत्याही गावाला धोका नसून अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. दरम्यान, ठाणे-पालघर येथील क्षेत्रातही दमदार पाऊस झाला आहे. भातसा-१०१, धामणी-१८०, कवडास – १८०, वांद्री-७६, तानसा-१९५ तर बारवी धरण क्षेत्रांमध्ये ६८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

नागोठणे – मुसळधार पावसाने नागोठणे, निडी, वाकण, रोहा, कोलाड, चणेरा, खांब, धाटाव, सुतारवाडी यासह संपूर्ण तालुक्याला चांगलेच झोडपून काढले आहे. त्यातच नागोठणे आणि रोहय़ाची जीवनवाहिनी असलेल्या अंबा आणि कुंडलिका नद्यासुद्धा तुडुंब वाहत असून जनजीवन विस्कळीत झाले. भिरा व डोलवहाल धरणातून पाणी सोडण्याची भीती असून असे धरणातून पाणी सोडले गेल्यास त्याचा फटका नागोठणे, रोहा अष्टमी शहर आणि लगतच्या गावांना बसणार आहे.

राज्यात विविध ठिकाणी पडलेला पाऊस (मिलीमीटरमध्ये)

कोकण – पेन २६०, म्हसाळा, मोखेडा २१०, जव्हार २००, डहाणु, तलासरी १९०, हर्णे १८० उरण १७०, अलिबाग १६०, मुंबई (कुलाबा) १५० माथेरान, रोहा, शहापूर १४०, अंबरनाथ, गुहागर, कल्याण, मुरबाड, मुरुड, उल्हासनगर, किक्रमगड १३०, चिपळूण, खेड, पनवेल, पोलादपूर, संगमेश्वर १२०, भिवंडी, महाड ११०, श्रीवर्धन १००.

मध्य महाराष्ट्र – महाबळेश्वर १७०, ओझरखेडा १४०, मोहोळ १००, इगतपुरी, शिरपूर ९०, हरसूल, त्र्यंबकेश्कर ७०, गगनबावडा 60.

मराठवाडा – घनसावंगी ९०, अंबड, औंढा-नागनाथ, उमरगा ७०, पाथरी, सेलु ६०, अहमदपूर, भूम, परांडा ५० अर्धापूर, किनवट, परतूर ४०.

विदर्भ – अकोट १००, लाखंदूर, लाखानी, मोहाडी, पुसद ९०, देसाईगंज, तुमसर ८०, अकोला, रामटेक, तिरोरा ७०, अहिरी, ब्रम्हपुरी, मलकपूर, साकोली ६०.

घाटमाथा…डुंगरवाडी, कोयना(पोफळी) २१०, ताम्हिणी, भिरा १९० शिरगाक १८० अम्बोणे १५०, दावडी १४० ,धारावी १३०, भिवपुरी ११०, खोपोली, लोणावळा ८०

मध्य प्रदेशात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्र आणि अरबी समुद्रातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे मुंबईसह कोकणात पावसाने दणका दिला आहे. गुजरातकडे सरकत असलेल्या या कमी दाब क्षेत्राची तीव्रता २४ तासांमध्ये वाढणार असून, मुंबई, ठाणे, पालघरमध्ये हाय अलर्ट देण्यात आला असून, उत्तर मध्य महाराष्ट्र, गुजरातमध्येही धुव्वाधार पाऊस पडणार असल्याने सतर्कतेचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या