अस्मानी संकट!

90

पाऊस मुंबईतला असो की, गुजरात-बिहारमधला. त्यात फरक न करता मदतकार्य, खबरदारीचे उपाय आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापनास सहकार्य करण्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे. तूर्तास मुंबईकरांच्या सुरक्षिततेलाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. येत्या २४ तासांत आणखी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रात्र अस्मानी संकटांची आहे. डोळय़ात तेल घालून या आपत्तीशी दोन हात करावेच लागतील!

धो-धो कोसळणाऱ्या पावसाने मुंबईचे जनजीवन ठप्प केले आहे. पावसाने दाणादाणच अशी उडवली की, सदैव धावणारी मुंबई काही तासांत स्तब्ध झाली. तुफानी पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली गेले. रेल्वेमार्गांवरही पाणीच पाणी झाले. त्यामुळे रस्ते वाहतुकीबरोबरच मुंबईची जीवनवाहिनी म्हणून ओळखली जाणारी लोकल रेल्वेची वाहतूकही सपशेल कोलमडली. राज्याच्या इतर भागांतही पाऊस कोसळतो आहे; मात्र मुंबई-ठाण्यासारखा रुद्रावतार तिकडे नाही. दहीहंडीसोबतच पुनरागमन केलेल्या पावसाने मुबंई, ठाणे आणि उपनगरांना तसे जवळपास रोजच तडाखे सुरू केले होते. तथापि, अधूनमधून विश्रांती घेत हा पाऊस कोसळत होता. त्यामुळे पाण्याचा निचरा होण्यास मदत झाली आणि या संपूर्णच पावसाळ्यात साचलेल्या पाण्याने मुंबईचे जनजीवन विस्कळीत होण्याचा प्रसंग सुदैवाने उद्भवला नव्हता. सोमवारी मात्र पावसाने कहरच केला. तीन तासांत १५० मि.मी. पाऊस झाला. आभाळच असे एकाएकी फाटल्यावर ठिगळ तरी कुठे लावणार? अविश्रांत कोसळणारा पाऊस रस्त्यावरील पाण्याचा निचराच होऊ देत नसल्यामुळे अनेक रस्ते जलमय झाले. खास करून दक्षिण मुंबई आणि उपनगरांमध्ये पावसाने अधिकच धुमाकूळ घातला. बोरिवली, गोरेगाव, अंधेरी, विलेपार्ले, वरळी, दादर, महालक्ष्मी, गिरगावपासून ते लालबाग, परळ, घाटकोपर, विक्रोळी, मुलुंड या सगळय़ाच परिसराला
मुसळधार पावसाने
झोडपून काढले. पावसामुळे मंदावलेला वाहतुकीचा वेग नंतर जवळजवळ ठप्पच झाला आणि सर्वत्रच वाहतुकीची कोंडी झाली. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून दुपारनंतरच्या शाळांना सुटी देण्यात आली. काही गणेश मंडळांच्या पेंडॉलमध्ये पाणी शिरल्याने लालबागच्या राजासह अनेक मंडळांनी दर्शन थांबवले, हे बरेच झाले. अशा नैसर्गिक संकटाच्या वेळी घराबाहेर न पडणे हेच सर्वोत्तम. मुंबई महापालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि एकूणच प्रशासन रस्त्यांवरील पाणी उपसण्यासाठी जीव तोडून प्रयत्न करीत असताना अर्ध्या हळकुंडाने पिवळय़ा झालेल्या काही मंडळींना मात्र नेहमीप्रमाणे नालेसफाई योग्य न झाल्यामुळे पाणी साचल्याचा साक्षात्कार झाला. वास्तविक नालेसफाई तर झाली होतीच आणि रस्त्यांवरील पावसाचे पाणी नाल्यांद्वारे वेगाने वाहून जाईल, याची काळजीदेखील प्रशासनाने घेतली होती. मात्र, शिवसेनाद्वेषाची कावीळ झालेले काही लोक नाल्यांतून बाहेर पडायलाच तयार नाहीत. पावसाचा जोरच इतका आहे की, नाले तुडुंब भरून वाहात आहेत. नाल्यांच्या वहनक्षमतेपेक्षाही अधिक पाऊस झाल्याने रस्त्यांवरील पाणी संथगतीने नाल्यात मिसळते आहे. पाण्याचे नाल्यातील ‘आऊटगोइंग’ कमी असतानाच वरून पावसाचे धो-धो ‘इनकमिंग’ मात्र सुरूच आहे. पाणी साचण्याचे मुख्य कारण हेच आहे, हे ठाऊक असूनही मुंबई महापालिकेला बदनाम करण्याची सुपारी घेणारे लोक नाल्याचा मैला बाहेर काढत असतात. वास्तविक कमी वेळात पडणारा प्रचंड पाऊस हे नैसर्गिक संकटच असते. २००५ च्या २६ जुलैलाही मोठय़ा प्रमाणात हेच घडले होते. बरे, मुंबईच कशाला, आपल्या देशातच अनेक राज्यांत आणि
तिकडे अमेरिकेतही अतिवृष्टीच्या
तडाख्याने जनजीवन विस्कळीत होत आहे. मुंबईच्या तुलनेत किरकोळ लोकसंख्या असणाऱया हय़ूस्टन आणि टेक्सास या शहरांची आज मुसळधार पावसाने काय अवस्था करून ठेवली आहे, ते जरा बघा. हय़ूस्टन हे अमेरिकतले तसे चौथ्या क्रमांकाचे मोठे शहर आहे. दोन दिवसांपासून पडत असलेल्या पावसामुळे हय़ूस्टनच्या रस्त्यांवर छातीइतके पाणी तुंबले आहे. नद्यांमध्ये रूपांतरित झालेल्या रस्त्यांवरून ३० हजारांवर नागरिकांना बोटीद्वारे सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. पाण्याखाली गेलेल्या टेक्सास आणि हय़ूस्टन या शहरांत शिवसेनेची सत्ता नाही, हे महापालिकेवर टीका करणाऱया दीड शहाण्यांनी समजून घ्यायला हवे. १५ दिवसांपूर्वी चीनची राजधानी असलेल्या बिजिंगपासून हाँगकाँगपर्यंत पावसाने अशीच दाणादाण उडवली होती. जुलैच्या अखेरच्या आठवडय़ात तर गुजरात, राजस्थानमध्ये महापुराने थैमान घातले. एकटय़ा गुजरातमध्येच २१३ लोक मृत्युमुखी पडले. बिहार, आसामसह उत्तरेकडील अनेक राज्यांनाही आठवडाभरापूर्वी पुराचा असाच विळखा पडला होता. तिथे मात्र हे दांडकीबहाद्दर कधी प्रश्न विचारायला जात नाहीत. पाऊस मुंबईतला असो की, गुजरात-बिहारमधला. त्यात फरक न करता मदतकार्य, खबरदारीचे उपाय आणि एकूणच आपत्ती व्यवस्थापनास सहकार्य करण्यासाठी सर्वांनीच पुढे यायला हवे. तूर्तास मुंबईकरांच्या सुरक्षिततेलाच आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. येत्या २४ तासांत आणखी अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. रात्र अस्मानी संकटांची आहे. डोळय़ात तेल घालून या आपत्तीशी दोन हात करावेच लागतील!

आपली प्रतिक्रिया द्या