मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनांची वाहतूक 30 सप्टेंबरपर्यंत बंद

mumbai-goa-highway-potholes

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. गौरी गणपतीच्या सणासाठी चाकरमान्यांची पाऊले आता गावाकडे वळणार आहेत. गणपतीत कोकणात गावी जाणाऱ्याची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्यासाठी मुंबई गोवा महामार्गावर येत्या 30 सप्टेंबरपर्यंत जड-अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले आहेत.

यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबर 2023 पासून साजरा होत आहे. या सणानिमित्त कोकणात जाणा-या भाविकांची संख्या प्रचंड प्रमाणात असते. मुंबई-गोवा क्र 66 वर जाणारी अवजड वाहतूक बंद करणे आवश्यक असल्याने जिल्हादंडाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी महाराष्ट्र शासन गृहविभाग क्र.एम.व्ही. ए-०५८९/सीआर/१०६१/टीआरए-२, १९ मे १९९० चे अधिसूचनेनुसार मोटार वाहन कायदा कलम ११५, ११६ अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन पुढीलप्रमाणे आदेश निर्गमित केले आहेत. मुंबई-गोवा महामार्ग क्र. ६६ वर ५ ते ३० सप्टेंबर २०२३ या काळात गणेशोत्सव सण पूर्ण होईपर्यत जड-अवजड वाहतुक बंद करण्यात येत आहे. हा आदेश दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर, लिक्वीड, मेडीकल ऑक्सीजन, औषधे व भाजीपाला इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारे वाहने वगळून तसेच अग्निशमन दल, पोलीस, रुग्णवाहिका, एसटी महामंडळ बसेस, ट्रॅव्हल्स बसेस व अत्यावश्यक सेवेतील अशा सर्व वाहनांना लागू असणार नाही.