आरोपीला फासावर लटकवण्यासाठी न्यायालयीन लढाईत मदत करा, यशश्रीच्या कुटुंबीयांची असीम सरोदे यांना विनंती

यशश्री शिंदे हिची दाऊद शेख या नराधमाने अत्यंत निर्दयी पद्धतीने हत्या केली आहे. त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या नराधमाला फासावर लटकवण्यासाठी आम्हाला न्यायालयीन लढाईत मदत करा, अशी विनंती यशश्री शिंदे हिच्या कुटुंबीयांनी कायदेतज्ज्ञ अॅड. असीम सरोदे यांना एका पत्राद्वारे केली आहे.

यशश्री शिंदे हिने लग्नाला नकार दिल्यामुळे दाऊद शेख याने अत्यंत निर्दयी पद्धतीने तिची हत्या केली. हा प्रकार घडल्यानंतर गेल्या काही दिवसांपूर्वी असीम सरोदेही आमच्या घरी येऊन गेले. त्यांनी जर आम्हाला न्यायालयीन लढाईमध्ये मदत केली तर दाऊद शेखला कठोर शिक्षा होऊ शकते. त्यामुळे आम्ही त्यांना मदतीसाठी विनंती करीत आहोत, असे यशश्री शिंदे हिच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केले आहे. असीम सरोदे यांच्या पथकातील अॅड. सिद्धार्थ इंगळे, अॅड. श्रिया आवळे आणि अॅड. बाळकृष्ण निढाळकर यांनी यशश्री शिंदे हत्याकांडाचे कामकाज पाहावे, अशी इच्छा परिवारातील सर्व सदस्यांनी व्यक्त केली आहे.

मार्गदर्शन करणार

यशश्री शिंदे हिची हत्या अत्यंत निर्दयीपणे करण्यात आली आहे. अशा प्रकारचे गुन्हे समाजात पुन्हा घडू नये यासाठी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे. न्यायालयीन खटल्यामध्ये तिच्या कुटुंबीयांना मदत आणि मार्गदर्शन करण्याची जबाबदारी घ्यायला आम्ही तयार आहोत. त्यांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास ही आमच्या कामाची आणि प्रामाणिकपणाची पोचपावती आहे, अशी प्रतिक्रिया अॅड. असीम सरोदे यांनी व्यक्त केली आहे.