विक्रोळी दरड दुर्घटनाबाधितांना पाचव्या दिवशीच मदत, सरकारकडून जाहीर केलेली मदत सुपूर्द

विक्रोळी सूर्यानगर येथे घरांवर दरड कोसळण्याची दुर्घटना नुकतीच घडली. या दुर्घटनेत मृत व्यक्तींना पाच लाख रुपयांची तर जखमींना मोफत वैद्यकीय मदतीची घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. दुर्घटनाबाधितांना दिलेले हे वचन शुक्रवारी अखेर पूर्ण करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आदेशानंतर अवघ्या पाचव्याच दिवशी दुर्घटनाबाधितांना मदत देण्यात आली.

मुंबईत 18 जुलै रोजी तुफान पाऊस पडला. अवघ्या काही तासांतच पडलेल्या 200 मिलीपेक्षा जास्त पावसामुळे दरड सुरक्षा भिंतीवर कोसळून झालेल्या दुर्घटनेत 10 जणांचा बळी गेला, तर एक जण किरकोळ जखमी झाला होता. या दुर्घटनेची गंभीर दखल घेत काही वेळातच मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी दुर्घटना स्थळाची पाहणी केली. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्य सरकारकडून मृतांच्या वारसांना पाच लाखांची मदत तसेच जखमींवर मोफत उपचार केले जातील असे जाहीर केले होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि मुंबई उपनगरचे पालकमंत्री आणि पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी जखमींवर मोफत उपचार सुरू करण्याचे आदेश देऊन ते तातडीने अमलातही आणले, तसेच मृतांना पाच लाखांचीही मदत आज अवघ्या पाचव्या दिवशी, तत्काळ देण्याचा निर्णय घेतला. स्थानिक आमदार सुनील राऊत यांच्या हस्ते मृत व्यक्तींच्या कुटुंबीयांना पाच लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द केला. यावेळी तहसीलदार डॉ. संदीप थोरात, मंडल अधिकारी बाळू कापसे, तलाठी सविता पावडे, विभागप्रमुख रमेश कोरगावकर, नगरसेविका राजराजेश्वरी रेडकर, शाखाप्रमुख उत्तम कुऱहाडे, माजी उपविभागप्रमुख विश्वास शिंदे, उपविभागप्रमुख धर्मराज पंत आदी उपस्थित होते.

आपली प्रतिक्रिया द्या