ज्येष्ठांसाठी हेल्पेज इंडियाचा विशेष गुढीपाडवा

सामना ऑनलाईन। मुंबई

मंगलमय गुढीपाडव्याच्या निमित्ताने मंगळवारी घरोघरी गुढी उभारल्या जातील आणि सगळेजण सहकुटुंब या नववर्षाचं उत्साहात स्वागत करतील. पण उतारवयाकडे झुकलेले आणि वृद्धाश्रमात उरलेले आयुष्य घालवणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांना मात्र हा आनंद मिळत नाही, कारण कुटुंब असूनही त्यांच्यासोबत सण साजरे करायला कोणीही येत नाही. अशा वृध्दाश्रमात एकाकी जीवन कंठणाऱ्या ज्येष्ठांबरोबर हेल्पेज इंडिया ही स्वयंसेवी संस्था विशेष गुढीपाडवा साजरा करणार आहे. यासाठी ऑल सेंटस होम या महिला वृध्दाश्रमात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.

हेल्पेज इंडिया या देशभरातील वृध्दांसाठी काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्थेने गुढी पाडव्यानिमित्त संगीताचा विशेष कार्यक्रम आयोजित केला आहे यासोबतच गप्पा,स्नेहभोजन देखील आयोजित करण्यात आलं आहे.

नोटाबंदीनंतर रोकडरहित व्यवहार करणं गरजेचं झाले आहे. अनेक ज्येष्ठ नागरिकांना याबाबत फारशी माहिती नसते त्यामुळे त्यांना व्यवहारात अडचणी येत असतात. ही बाब ओळखून गुढी पाडव्याच्या दिवशी रोकडविरहीत व्यवहारांबद्दल या ज्येष्ठ नागरिकांना माहिती दिली जाणार आहे. या कार्यक्रमात एशियन पेंटचे कर्मचारीही सहभाग घेणार आहेत.

आपली प्रतिक्रिया द्या