असहाय महिला आणि अनावर, अत्याचारी पुरुष

651

शिरीष कणेकर

बेंगळुरू येथे एका महिलेचा मोटरसायकलवरून आलेल्यांनी राजरोस विनयभंग केला. या लाजिरवाण्या घटनेवर देशभर तीक्र प्रतिक्रिया उमटतायत. ‘निर्भया प्रकरणा’पासून हेच चाललंय. तीक्र प्रतिक्रिया, त्यानिमित्तानं राजकीय धुळवड. पक्षीय राजकारणाची पोळी भाजून घ्यायची. हे कसले राज्यकर्ते असा संतप्त सवाल विरोधी पक्षांनी उठवायचा. तुमच्या राजवटीत असे निंद्य प्रकार किती घडले याची आकडेवारी देऊ का, असा पलटवार सत्तारूढ पक्षानं करायचा. अशा गोष्टी घडायच्याच असा एक पूर्णपणे विसंगत सूर लावून चर्चा भलत्याच दिशेला न्यायची. त्या व तिच्यासमान बळी पडलेल्या महिलांनी आपल्याला न्याय मिळेल व अशा प्रकारांना आळा घातला जाईल, याकडे डोळे लावून बसायचं. दुसरी कोणी अभागी वासनांना बळी पडली की पुन्हा हे चक्र नवीन उत्साहानं फिरणार. मग टी.व्ही.वर चर्चा, वृत्तपत्रातून लेख, कट्टय़ावर गप्पा… चलने दो.

त्या बुभुक्षित माणसांचा केवळ विनयभंग करण्याचा हेतू होता असं मला वाटत नाही. त्यांनी एवढय़ा माफक अपेक्षा का ठेवाव्यात? लांबवर उभ्या असलेल्या प्रेक्षकांमुळे त्यांच्या अधिक नीच मनसुब्यांवर विरजण घातलं असावं. बघे हे निव्वळ बघेच असतात. ते पीडित महिलेच्या मदतीला कधीही जात नसतात हे हल्लेखोरांनी विचारात घेतले नाही. त्यामुळे का होईना, ती अबला अधिक विटंबनेपासून बचावली. हे बघ्यांचे योगदान!

या अशा घटना सर्वत्र वाढत चालल्यात. आपल्याला हवं ते सहजासहजी मिळत नसेल तर बळजबरीनं हिसकावून घ्यायचं ही पाशवी वृत्ती बळावत चालल्येय. (पण पशू बलात्कार करीत नसतात.) या वृत्तीच्या माणसांना दहशत बसेल असं काही कायदा व पोलीस यंत्रणा करू शकलेली नाही. अशा गुन्हेगारांच्या नावानं गळा काढणाऱया स्त्रीमुक्ती संघटना कुऱ्हाडीचा दांडा ठरतायत. अत्याचार करणाऱयांना सुधारण्याचा वाव द्यायला हवा अशी त्यांची तथाकथित मानवतावादी भूमिका असते. जिच्या देहाचा व त्याहून जास्त जिच्या मनाचा पालापाचोळा झालाय त्या उद्ध्वस्त नारीच्या न्यायाचं काय? आपल्यावर अघोरी बलात्कार करणाऱयांचं पुनर्वसन करण्याचे प्रयत्न स्त्री संघटनांकडून होताना पाहून तिच्या जिवाचं काय होत असेल? ‘निर्भया प्रकरणा’नंतर देश पेटून उठलाय असं वाटत होतं, पण तो आता विझलेला दिसतोय. भावनेची तीक्रता आपण फार काळ राखू शकत नाही ही दुर्दैवी गोष्ट आहे. पाक पुरस्कृत मुंबई हल्ला आपण कितीसा लक्षात ठेवलाय? किती काळ आपलं रक्त खवळत राहिलं? आजही आपला तो राग कायम आहे का? – स्पष्ट आणि खरं सांगायचं तर उत्तर आहे ‘नाही.’ आपलं असं का आहे? आपण इतके मुर्दाड कसे? आपल्याला सतत नवीन दुर्घटना लागतात. ती घडली की मागली मागे पडते. ‘निर्भया’देखील मागे पडल्यासारखी झाल्येय. तिच्यावर सामूहिक बलात्कार करून अत्यंत अमानुषपणे तिचा खून करणाऱयात सर्वात अंगावर काटा आणणारी किळसवाणी कृती करणारा अल्पवयीन होता. त्यामुळे प्रचलित कायद्यानुसार त्याला शिक्षा न होता सुधारगृहात धाडण्यात आले. इतकी भयानक गोष्ट करणारा अल्पवयीन कसा? अल्पवयीनच्या कल्पनेत वा कक्षेत तो कसा बसतो? झापडं लावून कायद्याची अंमलबजावणी केली की हे असंच होणार. उद्या ‘वयात’ आल्यानंतर ‘सुधारित’ मुलगा काय करेल अशी अपेक्षा आहे?

नुकतीच एका शाळकरी मुलीनं सामूहिक बलात्कारानंतर आत्महत्या केली. काय करेल बिचारी? कलंकित आयुष्य जगण्याची कल्पना तिला सहन झाली नसावी. तिला मृत्यू जवळचा वाटला. पुढे काय? काहीच नाही. तिचं आत्मसमर्पण व्यर्थच म्हटलं पाहिजे. त्यामुळे समाज जागा झाला नाही, कायदा व सुव्यवस्था कडक झाली नाही की भावी बलात्कारपटूंना जरब बसली नाही. स्त्रियांवरील लैंगिक अत्याचार सातत्यानं चालूच आहेत.

पोलीस तसं म्हणत नाहीत, पण त्यांना म्हणायचं असतं की कानाकोपऱ्यात हजर राहणं आम्हाला शक्य नाही, लिंगपिसाटांचा सुळसुळाट झालाय, आम्ही किती पुरे पडणार व कायद्याच्या कक्षेत राहूनच आम्हाला काम करावं लागतं. आमचाही थोड्या सहानुभूतीनं विचार करा. त्यांचंही खोटं नाही.

अबू आझमी (दुसरं कोण?) आणि समविचारी उरफाटय़ा डोक्याच्या माणसांनी एक वेगळीच ‘थिअरी’ मांडल्येय. त्यांच्या म्हणण्यानुसार, पाश्चात्य संस्कृतीच्या प्रभावामुळे आधुनिक तरुणी कमी, लांडे, तोकडे व कामभावनेला उत्तेजन देणारे उत्तान कपडे घालतात व त्यापायी लैंगिक गुन्हे घडतात. अर्थात अबू आझमी व पिलावळ या गुन्हय़ांचा निषेधच करतात. पण या निषेधाचा जोर स्त्रियांच्या उत्तान कपडय़ांच्या निषेधाच्या तुलनेत दुबळा वाटतो. एकविसाव्या शतकात महिलांनी अंगभर वस्त्रं (बुरखा?) परिधान करावीत व शक्यतो घरातून बाहेर पडू नये ही अपेक्षा मान्य होण्यासारखी नाही. आपण सतत पुरुषांचे लक्ष्य आणि भक्ष्य आहोत या भीतीच्या आवरणाखाली त्या राहू शकत नाहीत. उलट महिलांना कधीही, कुठेही बिनदिक्कत फिरता येण्यात समाजाचा सुसंस्कृतपणा दिसतो.

मध्यंतरी नटनटय़ांचं ‘दर्शन’ घेण्यासाठी घरातून पळून आलेल्या दोन मुली रात्री बांद्रय़ात बेवारशासारख्या फिरत होत्या. त्यांना दोन तरुणांनी पाहिलं. चौकशी करून ते त्या मुलींना ते वेटर म्हणून काम करीत होते त्या हॉटेलात  घेऊन गेले.

‘इथे आराम करा. सकाळ होताच घरी निघून जा.’ त्यांनी त्या भांबावलेल्या मुलींना सांगितले व स्वत: रात्रभर दुकानाच्या फळीवर बसून राहिले.

ही आपली संस्कृती आहे, परंतु तिची पत्रास न ठेवणारे नराधमही समाजात वावरतायत. मित्रांबरोबर खुशाल हॉटेलात जाणाऱया व त्यांनी दिलेले गुंगीचं औषध (ते डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय कसं मिळतं?) पिऊन त्यांच्या वासनेची शिकार होणाऱया मुलींविषयी सहानुभूती वाटून घेणं कठीण होऊन बसतं. आपल्या शारीरिक दुर्बलतेची जाण त्यांना असायलाच हवी. मुलींनी बाहेर जाताना पर्समध्ये तिखटाची पुडी ठेवावी अशी उपाययोजना बाळासाहेब ठाकरेंनी सुचवली होती. त्याचाही गंभीरपणे विचार व्हायला हवा. लग्नाला नकार दिला म्हणून मुलींच्या तोंडावर ऑसिड फेकणाऱया उलटय़ा काळजाच्या माणसांबद्दल काय म्हणाल? मुलींना नकार देण्याचा अधिकारच नाही का? समजतात ते कोण स्वत:ला? नकार आल्यावर मुलीनं असं अघोरी पाऊल उचलल्याचं कधी ऐकलंय? त्यांच्या सोशिकपणाचा तुम्ही किती गेरफायदा घ्याल? त्यांना तुम्ही गुलाम समजता का? तुम्ही लाख समजाल, पण सबला होण्याच्या ईर्षेत या अबला आता जागृत झाल्यात. जागे व्हा, सावध व्हा, वागणूक सुधारा, नजीकच्या भविष्यकाळात या कामांध पुरुषांचं रावणाच्या प्रतिमेसारखं दहन होताना बघायला मिळेल. मग ‘पुरुषांना संरक्षणाची गरज आहे काय?’ असे परिसंवाद झडतील.

फार फार पूर्वी अश्मयुगीन काळात ‘आय फॉर ऍन आय, टूथ फॉर टूथ’ असा जशास तसे कायदा होता. आजही सौदी अरेबियात चोरी करणाऱयांचा हात तोडला जातो. बलात्कार, खून करणाऱयाला मैदानात प्रेक्षकांच्या उपस्थितीत दगडांनी चेचून मारले जाते. कल्पनेनेच आपल्या अंगावर शहारे येतात. आपल्याला ही शिक्षा अमानवी, राक्षसी व अंगावर काटा आणणारी वाटते. पण एक सांगा, ज्या गुन्हय़ाबद्दल ही अतिकठोर शिक्षा ठोठावली जाते तो गुन्हा – बलात्कार व खून – आपल्याला तेवढाच भयानक का वाटत नाही? या शिक्षेची सौदी जनतेत दहशत आहे. त्यामुळे या गुन्हय़ांची संख्याही अगदीच किरकोळ आहे.

परंतु हे अघोर पाऊल उचलणे आपल्याला शक्यच नाही. आपल्या संस्कृतीच्या शेंडीला झिणझिण्या येतील. आपल्या अहिंसेला काळं फासलं जाईल. एकदम मान्य. पण मग दुसरा काही उपाय सुचतोय?

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या