वाढत्या लोकसंख्येमुळेच आगीची दुर्घटना!

सामना प्रतिनिधी । मुंबई

मुंबईतील कमला मिल्स कंपाऊंडमधील रेस्टॉरंटला लागलेल्या आगीची दुर्घटना शहरातील वाढत्या लोकसंख्येमुळे घडली असे वक्तव्य खासदार हेमामालिनी यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे वाद होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दुर्घटनेनंतर पोलिसांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी चांगल्याप्रकारे काम केले, मात्र या शहरातील वाढती लोकसंख्या हे अशा दुर्घटनांमागचे प्रमुख कारण आहे. मुंबई शहर जिथे संपते तिथून दुसरे शहर सुरू व्हायला हवे, मात्र तसे होत नाही. मुंबईचा अयोग्य पद्धतीने विस्तार होत आहे. या दुर्घटनेबाबत दु:ख व्यक्त करण्याऐवजी हेमामालिनी यांनी मोठ्य़ा शहरांची लोकसंख्या किती असावी, शहरात किती लोकांनी राहावे, शहरांची सीमा ठरवण्यात यावी याबाबत वक्तव्य केल्याने नाराजी व्यक्त होत आहे. त्यांच्या या वक्तव्याविरोधात सोशल मीडियावरही टीका झाली. त्यांचे हे विधान असंवेदनशील असून त्यांनी मुंबई शहराचा अपमान केल्याच्या भावना सोशल मीडियात व्यक्त होत आहेत. त्यामुळे त्यांच्या या वक्तव्याने वाद होण्याची शक्यता आहे.

आपली प्रतिक्रिया द्या