लेख – ‘कोरोना’ संकटः एक व्यापारी संधी

1198

>> ब्रिगेडियर हेमंत महाजन

कोरोना व्हायरसचा हिंदुस्थानच्या आर्थिक व्यवस्थेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला. त्यात या परिस्थितीचा आपण कसा फायदा घेऊ शकतो यावर उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावर विचार करून आवश्यक पावले उचलत आहे. आर्थिक व्यापाराचे दोन भाग आहेत- आयात आणि निर्यात. सध्या आपण चीनपासून प्रचंड आयात करतो, निर्यात फार कमी आहे आणि व्यापाराची तूट प्रंचड आहे, जी हिंदुस्थानकरिता धोकादायक आहे. ती आता कमी होण्याची शक्यता आहे.

कोरोना व्हायरसकडे संकट म्हणून न बघता एक संधी म्हणून बघितले  पाहिजे आणि हिंदुस्थानची आर्थिक व्यवस्था मजबूत करून  हिंदुस्थान-चीन व्यापारी तूट कमी करण्याची संधी आहे. जगात चीन कच्च्या तेलाचा सर्वात मोठा आयातदार देश आहे. चीनमध्ये कोरोना व्हायरस मोठ्या प्रमाणात पसरल्यामुळे चीनने जागतिक बाजारात कच्च्या तेलाची मागणी घटवली. हिंदुस्थान आणि चीन मोठ्या प्रमाणावर इंधन आयात करतात. हिंदुस्थान आणि चीनच्या मागणीवर इंधनाचे दर ठरत असतात. कच्च्या तेलाच्या किमती कोसळल्या, त्याचा फायदा हिंदुस्थानी अर्थव्यवस्थेला झाला आहे. या वर्षीच्या तिमाहीत कच्च्या तेलाचा आंतरराष्ट्रीय खप मागच्या वर्षीपेक्षा 4.35 लाख बॅरलने घटण्याची शक्यता आहे. मागच्या दोन महिन्यांत पेट्रोलच्या दरात चार रुपयांनी घसरण झाली आहे. बेंट क्रूडचे अर्थात कच्च्या तेलाचे दर आता 50 डॉलरवर येऊ शकतात. याचा फायदा हिंदुस्थानी इंधन बाजाराला मिळणार आहे.

कोरोनामुळे आलेल्या मंदीमुळे आणि कच्च्या तेलाच्या जागतिक बाजारात ओपेक व रशियात चाललेल्या संघर्षामुळे तेलाच्या किमती खूप कमी झाल्या आहेत. तेलाच्या किमती कोसळल्यामुळे हिंदुस्थानचे तेलाचे बिल आता 50 टक्के कमी झाले आहे. हा आपल्या देशाला फार मोठा फायदा आहे. सर्वसामान्यांसाठी तेलाच्या किमतीतील घट ही दिलासादायकच आहे.

अमेरिकेबरोबर चाललेल्या व्यापार स्पर्धेमुळे चिनी आर्थिक व्यवस्था आधीपासूनच दबावात आहे. कोरोना व्हायरसचा चिनी शेअर बाजारावर मोठा नकारात्मक परिणाम झाला आहे आणि अजून होण्याची शक्यता आहे. कोरोना व्हायरसमुळे चीनचा विकास दर एक टक्क्याने घटू शकतो. अर्थव्यवस्थेचे 9.66 लाख कोटी रुपयांचे नुकसान होऊ शकते.

शिवाय चीनच्या आंतरराष्ट्रीय प्रतिमेवर गंभीर परिणाम होत आहे. गेल्या 30 वर्षांत प्रथमच चीनची अर्थव्यवस्था इतकी ढासळली आहे. त्यामुळे चीनचा आता लष्करी आधुनिकीकरणावर कमी खर्च होईल व आपल्याला आपली लष्करी ताकद वाढवण्यास जास्त वेळ मिळेल.

ऑस्ट्रेलियापासून आफ्रिकेपर्यंत, जपानपासून अमेरिकेपर्यंत अनेक देशांत चीनने अनेक प्रकल्प हाती घेतले आहेत. त्यामध्ये 40 अब्ज डॉलर्सचा चायना-पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉरसारखे अनेक प्रकल्प आहेत. असाच कॉरिडॉर चीन म्यानमार, नेपाळसोबत विकसित करत आहे. बॉर्डर रोड इनिशिएटिव्हअंतर्गत अब्जावधी डॉलर्सचे प्रकल्प चीनने हाती घेतले आहेत, पण या सर्व प्रकल्पांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे ही हिंदुस्थानकरिता एक चांगली बातमी आहे.

हिंदुस्थान आणि चीनमध्ये मोठा व्यापार आहे. त्यात आपण नव्वद अब्ज डॉलर किमतीच्या मालाची आयात करतो तर 15 अब्ज डॉलरच्या वस्तूंची निर्यात करतो. म्हणजेच व्यापारी तूट प्रचंड आहे. हिंदुस्थान जगाला सुमारे वीस अब्ज डॉलरची स्वस्त औषधे निर्यात करतो; परंतु आपण बनवत असलेल्या औषधांसाठी लागणारा 85 टक्के कच्चा माल आपण चीनकडून आयात करतो. अशा बाबतीत कोणत्याही एका देशावर अवलंबून राहणे चुकीचेच आहे. त्यासाठी पर्यायी कच्च्या मालाची व्यवस्था करणे आवश्यक आहे.  चीनकडून आपल्याकडे मोबाईलचे सुटे भाग, इलेक्टॉनिक्स वस्तूंची 85 टक्क्यांपर्यंत आयात केली जाते. कोरोना व्हायरसमुळे आता चीनमधून आयात होणार्‍या वस्तू येत नाहीत. इलेक्टॉनिक्स वस्तूंसाठी लागणार्‍या कच्च्या मालासाठीही आपण दक्षिण कोरिया, जपान हे पर्याय समोर ठेवायला हवेत.

दीर्घकाळाचा विचार करता त्यातून आपलाच फायदा होणार आहे. यानिमित्ताने हिंदुस्थान आणि चीन यांच्यातली मोठी व्यापारी तूट कमी करण्याची संधी आहे. कापड उद्योगाला यातून मोठी संधी आहे. हिंदुस्थानी कापड उद्योग आता नवीन पर्याय शोधू शकतील.

कोरोना व्हायरसचा हिंदुस्थानच्या आर्थिक व्यवस्थेवर नेमका काय परिणाम होऊ शकतो याचा चेंबर ऑफ इंडियन इंडस्ट्रीजने अभ्यास केला. या अभ्यासामध्ये निर्माण झालेल्या परिस्थितीचा आपण कसा फायदा घेऊ शकतो यावर अनेक उपाययोजना सुचवण्यात आल्या आहेत. सरकार त्यावर विचार करून आवश्यक पावले उचलत आहे. आर्थिक व्यापाराचे दोन भाग आहेत- आयात आणि निर्यात. सध्या आपण चीनपासून प्रचंड आयात करतो, निर्यात फार कमी आहे आणि व्यापाराची तूट प्रंचड आहे, जी हिंदुस्थानकरिता धोकादायक आहे. ती आता कमी होण्याची शक्यता आहे. देशात औषधी निर्माणाचा 85 टक्के कच्चा माल चीनमधून येतो. मात्र कच्च्या मालाची निर्मिती आपल्या देशातील सरकारी कारखाने म्हणजे हिंदुस्थान अँटिबायोटिक्स लिमिटेड किंवा इतर कारखान्यांमध्ये करता येईल, जे करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे. हिंदुस्थानी कारखाने हे नेहमीच अत्यंत कमी क्षमतेने काम करतात. ही संधी आहे, त्यांनी आपली क्षमता वाढवावी, ज्यामुळे किंमतीही खाली येतील.

आपण चीनऐवजी आयात दुसर्‍या देशापासून करून व्यापारी तूट कमी करू शकतो. चीनऐवजी दुसर्‍या राष्ट्रातून आयात करण्याकरिता आपल्याला इम्पोर्ट डय़ुटी म्हणजे आयातीवर लागणारा कर कमी करावा लागेल. अनावश्यक वस्तूंची विनाकारण आयात पण आता आपोआप थांबत आहे. जसे की, सणांना लागणारे सामान, खेळणी, शोभेच्या वस्तू. सामान्य नागरिकांनी चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून चीनला दणका द्यावा.

मात्र सध्या सर्वात जास्त संधी निर्यात क्षेत्रामध्ये वाढ करण्याची हिंदुस्थानसमोर आहे. त्याचा पुरेपूर वापर केला जावा. करोना व्हायरसमुळे चीन अनेक महिने जगाची फॅक्टरी म्हणजे कारखाना राहू शकणार नाही. म्हणून मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये जगाचा कारखाना बनण्याची हिंदुस्थानास संधी आहे. त्याचा पूर्ण वापर करून आपण चीनमधून बाहेर पडणार्‍या वेगवेगळ्या कंपन्यांना हिंदुस्थानमध्ये कारखाने स्थापन करण्यास भाग पाडावे आणि आपली निर्यात करण्याची क्षमता वाढवावी. मात्र चीन आणि अमेरिका व्यापार युद्ध सुरू झाल्यानंतर अशीच संधी आपल्यासमोर आली होती. आपण त्याचा पूर्ण फायदा घेऊ शकलो नाही. याउलट बांगलादेश, व्हिएतनाम आणि काही देशांनी ही संधी घेऊन आपली निर्यात क्षमता वाढवली. आशा करूया, या वेळेला सरकार आणि उद्योग जगत जास्त चपळपणा दाखवून मिळालेल्या संधीचा वापर करून हिंदुस्थानला जगाचा कारखाना बनवण्याकरिता एक मोठे पाऊल उचलतील.

[email protected]

आपली प्रतिक्रिया द्या