हेमराज जैन

परभणीच्या राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रातील विविध चळवळीत सक्रिय सहभागी असणारे हेमराज जैन यांचे निधन झाले. मराठवाडा विकास आंदोलन असो की, कृषी विद्यापीठाची स्थापना असो, त्यात त्यांचा सहभाग राहिला. ९ ऑक्टोबर १९३३ रोजी जन्मलेले हेमराज जैन यांनी वयाच्या २५ वर्षीच नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्थेचे सचिवपद सांभाळले. मॉडेल इंग्लिश स्कूलचे ते सचिव म्हणूनही कार्यरत होते. पत्रकार भवन, ललित कला मंडळाचे अध्यक्ष, लायन्स क्लब, कालानी प्रतिष्ठान, भारतीय जैन संघटनेचे सदस्य, अशा सामाजिक संघटनांत त्यांचा वावर होता. १९६८ ते १९८६ या काळात त्यांनी नगरपालिकेचे नगरसेवकपदही भूषवले. परभणी पीपल्स को. ऑपरेटिव्ह बँकेचे उपाध्यक्ष, प्रभावती सूतगिरणीचे संचालक, जिल्हा नियोजन विकास समितीचे सदस्य, जिल्हा कोअर शिक्षण मंडळाचे सदस्य, नगरपालिकेच्या स्वच्छता नियोजन समितीचे अध्यक्ष, जिल्हा बालसुधारगृहाचे सचिव अशा विविध क्षेत्रांत पत्रकार, संपादक असलेल्या हेमराज जैन यांनी आपल्या कार्यकौशल्याची मुद्रा उमटवली. साहित्य, सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांची कामगिरी लक्षणीय होती. ‘प्रभावती समाचार’ या दैनिकाचे ते संपादक होते. प्रतिवर्षी निघणारा ‘प्रभावती समाचार’ दिवाळी अंक हा साहित्य क्षेत्रातील प्रस्थापित आणि नवोदितांसाठी सकस साहित्याची मेजवानी असे.  हेमराजजी केवळ संपादकच नव्हते तर अनेक लेखकांच्या परिवाराशीही त्यांचा घनिष्ठ स्नेह होता. दिवाळी अंक नियमित काढणे, तोही ऐन दिवाळीत प्रकाशित करणे, लेखकाला मानधन अथवा दिवाळीची भेट घरपोच देणे, अशा गुणविशेषामुळे ते साहित्य परिवारातही आवडीचे व्यक्तिमत्त्व होते. साहित्य क्षेत्राप्रमाणेच पत्रकारितेमध्येही त्यांचे मोलाचे योगदान होते. मग ती संघटनांची बांधणी असो की, पत्रकार भवनची बांधणी असो, बँकिंग क्षेत्रातील कार्य असो, अध्यक्ष, उपाध्यक्षपदाची जबाबदारी नाहीतर शिक्षण क्षेत्रातील सचिवपदाची जबाबदारी असो, त्यात त्यांचा कायमच पुढाकार असायचा. मराठवाड्यामध्ये विकास आंदोलन आणि मराठवाडा स्वतंत्र कृषी विद्यापीठ व्हावे, यासाठी दिलेला लढा असो, अशाही कार्यात त्यांच्यातील कार्यकर्ता हा शेवटपर्यंत कार्यरत असायचा. त्यांच्या निधनाने परभणीच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्राची हानी झाली आहे.

 

आपली प्रतिक्रिया द्या