‘मी पासपोर्ट देते, तू मेडल दे’, स्वराज यांच्या मागणीला खेळाडूची मेडलची भेट

18

सामना ऑनलाईन । युक्रेन

युक्रेन येथे आयोजित आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये १५ वर्षीय झलक तोमरने ५४ किलो वजनी गटात रौप्य पदकाची कमाई करून हिंदुस्थानाचे नाव सुवर्णाक्षरात कोरले. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनीही झलकच्या या कामगिरीचे कौतुक करत ट्विटरवरून शुभेच्छाही दिल्या. ‘झलकसह सर्व विजेत्यांचे अभिनंदन, तुम्ही हिंदुस्थानाचा झेंडा अटकेपार रोवला आहे, असे ट्वीट परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी केले. ‘

काही दिवसांपूर्वीच झलकला युक्रेनमधील बॉक्सिंग स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पासपोर्टची गरज होती. पासपोर्ट ऑफिसमध्ये अर्ज दाखल करूनही तिला पासपोर्ट मिळत नव्हता. त्यावेळेस झलकने ट्विटरवर त्यासंबंधी एक फोटो ट्वीट केला होता. या फोटोला सुषमा स्वराज यांनी गमतीशीर पद्धतीने रिप्लाय दिला. ‘मी तुला पासपोर्ट देते, पण त्या बदल्यात तू मेडल आणशील’ असे सुषमा स्वराज यांनी झलककडून वचन मागितले.’ त्यानंतरच्या अवघ्या काही तासातच झलकला पासपोर्ट मिळाला.

रौप्य पदकाची कमाई केल्यानंतर झलक तोमरवर सर्व स्तरांवरून कौतुकाचा वर्षाव होत आहे. १२ ते १६ डिसेंबर दरम्यान आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेचे आयोजन युक्रेनमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत झलकसह अरूंधती चौधरी, मितिका गुनेले, राज साहिबा यांसारख्या स्पर्धकांनीही पदकांची कमाई केली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या