थोडी थोडी पिया करो! महिला आणि बालविकासमंत्र्यांचा महिलांना अजब सल्ला

छत्तीसगडमधील काँग्रेस सरकारने निवडणूकमध्ये दिलेले आपले आश्वासन पूर्ण करण्यासाठी राज्यात दारूबंदी लागू करण्याची तयारी करत आहे. याच दरम्यान आता छत्तीसगड सरकारमध्ये महिला आणि बालविकास मंत्री असलेल्या अनिला भेडिया यांनी महिलांना एक अजबच सल्ला दिला आहे. त्या म्हणाल्या आहेत की, ”झोपायच्या आधी एक पेग घेत जा, जेणेकरून तुम्ही तणावातून मुक्त होऊ शकाल.” त्यांनी केलेल्या या वक्तव्यावरून आता वाद निर्माण झाला आहे.

अनिला भेडिया म्हणाल्या आहेत की, ”महिला घर आणि कुटुंबाची काळजी घेतात. त्यांना मानसिक तणाव जाणवतो. अशा परिस्थितीत थोडी थोडी प्या आणि झोपा.” आपल्या वक्तव्यावरून वाद वाढत असल्याचे पाहून त्यांनी स्पष्टीकरण देत म्हटले आहे की, माझ्या वक्तव्याला चुकीच्या पद्धतीने सादर केले जात आहे. त्या म्हणल्या, ”मी दारूच्या आहारी गेलेल्या पुरुषांना संबोधित करत होते आणि मी त्यांना म्हणाली की कमी प्यायला हवी. घर आणि मुलांच्या जबाबदाऱ्यांमुळे महिलांना खूप मानसिक दबावाला सामोरे जावे लागते. मला म्हणायचे होते की दारूचे व्यसन वाईट आहे आणि प्रत्येकाने त्यापासून दूर राहायला हवं.”

दरम्यान, त्याच्या या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. मंत्री अनिला भेडिया बुधवारी छत्तीसगड येथील सिंघोला गावात लोकांना संबोधित करत होत्या. कमर जमातीच्या महिलांशी बोलताना त्या त्यांना सांगत होत्या की, जेव्हापासून सरकारने गावकऱ्यांना स्वतःची दारू बनवण्याची परवानगी दिली आहे, तेव्हापासून गावात दारूच्या विक्रीत वाढ झाली आहे.