महिला अत्याचाराच्या गुह्याचा तपास तातडीने व गांभीर्याने केला जातो, अशा बढाया मारणारे मुंबई पोलीस मुलीला त्रास देणाऱ्यावर कारवाई का करत नाही, असे खडेबोल उच्च न्यायालयाने सुनावले. याबाबत सहपोलीस आयुक्तांनी शपथपत्र दाखल करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.
सोशल मीडियावर बदनामी करण्याची धमकी देणाऱयाविरोधात एका मुलीने तक्रार केली. पोलिसांनी याचा गुन्हा नोंदवला. पोलीस आरोपीवर कारवाई करत नसल्याने मुलीने याचिका दाखल केली आहे. या याचिकेची गंभीर दखल न्या. अजय गडकरी व न्या. डॉ. नीला गोखले यांच्या खंडपीठाने पोलिसांवर तीव्र संताप व्यक्त केला. महिला अत्याचाराच्या तपासासंदर्भात पोलीस अधिक तत्पर असतात, असा दावा केला जातो. मग याचिकेचे शपथपत्र सहआयुक्त (कायदा व सुव्यवस्था) यांनी सादर करावे, असे आदेश न्यायालयाने दिले.
वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या मुलीने ठोठावले कोर्टाचे दार
अॅड. गुंजन शाह यांच्यामार्फत ही याचिका दाखल झाली आहे. मुंबईत राहणारी ही मुलगी वैद्यकीय शिक्षण घेत आहे. आरोपी तिला वारंवार त्रास देतो. मुलीने पोलिसांत याची तक्रार केली. दरम्यान डॉक्टरकीचे शिक्षण घेणाऱया मुलीला त्रास देणाऱया आरोपीचा गुन्हा गंभीर नसल्याचा धक्कादायक दावा मालवणी पोलिसांनी खंडपीठासमोर केला. त्यावर न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.