चांदिवलीतील वस्ताद लहुजी साळवे मैदानावर गरबा आयोजित करण्यास महापालिकेने परवानगी नाकारली आहे. पालिकेच्या या निर्णयात हस्तक्षेप करण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. हनुमानजी सेवा संस्थेने यासाठी याचिका केली होती. चांदिवली येथील वस्ताद लहुजी साळवे मैदानावर गरबा आयोजित करण्यासाठी परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज संस्थेने पालिकेकडे दिला होता.
पालिकेने ही परवानगी नाकारली. या मैदानावर गरबा आयोजित करण्यासाठी परवानगी देण्याचे आदेश न्यायालयाने पालिकेला द्यावेत, अशी मागणी याचिकेत केली होती. न्या. एम. एस. सोनक व न्या. कमल खाथा यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. संस्थेला पर्यायी जागेची यादी देण्याचे पालिकेला आदेश देत न्यायालयाने ही याचिका निकाली काढली.
पालिकेचे परिपत्रक
ज्या खेळाच्या मैदानांवर 2012 च्या आधी गणेशोत्सव, नवरात्री, दर्गा पूजा व अन्य उत्सव साजरे केले जात होते तेथेच यापुढे उत्सव साजरे करण्यासाठी परवानगी दिली जाईल, असे परिपत्रक पालिकेने 2013 मध्ये जारी केले होते. 2012 च्या आधी या मैदानावर गरबा आयोजित केला जात होता याचा एकही पुरावा संस्थेने सादर केलेला नाही. पालिकेचे परिपत्रक पक्षपाती नाही, असे न्यायालयाने नमूद केले.
न्यायालयाचे आदेश
गरबा आयोजित करण्यासाठी उपलब्ध मैदानांची यादी पालिकेने संस्थेला द्यावी. त्यानुसार संस्थेने परवानगीसाठी अर्ज करावा व त्यावर पालिकेने नियमाने निर्णय घ्यावा, असे आदेश न्यायालयाने दिले. यादी दिली जाईल, पण जागा उपलब्ध असेल तरच अर्जाचा विचार केला जाईल, असे पालिकेने स्पष्ट केले.
संस्थेचा दावा
येथील हनुमान मंदिराजवळ गरबा आयोजित केला जात होता. न्यायालयाच्या आदेशानुसार हे मंदिर पाडण्यात आले. पालिकेने 2022 मध्ये येथे गरबा आयोजित करण्यासाठी अन्य एकाला परवानगी दिली होती. त्यामुळे आता आम्हाला परवानगी नाकारली जाऊ शकत नाही, असा दावा संस्थेने केला होता.