बॉलीवूड अभिनेत्री जिया खान हिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास अमेरिकेच्या केंद्रीय तपास यंत्रणेद्वारे म्हणजेच FBI द्यावे केला जावा अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. जिया खान हिची आई राबिया खान हिने ही याचिका दाखल केली होती.
सदर याचिका केल्याबद्दल न्यायमूर्ती अजय गडकरी आणि न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या खंडपीठाने जिया खान हिची आई राबिया खान हिच्यावर ताशेरे ओढले. न्यायालयाचा महत्वपूर्ण वेळ वाया घालवत असल्याबद्दल या खंडपीठाने नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने राबिया खान हिच्या वकिलांना विचारले होते की, ‘कोणत्या कायद्यानुसार देशातील न्यायालये एफबीआयसारख्या परदेशी तपास यंत्रणांना तपासाचे आदेश देऊ शकतात. यावर राबिया खान यांच्या वकिलांनी उत्तर देण्याऐवजी वेगवेगळी कारणे दिली’
पीडितेने आत्महत्या केली नसून तिचा खून झाल्याचे दाखवण्यासाठी या न्यायालयाकडून आदेश प्राप्त करून घेण्याचा याचिकाकर्त्यांचा प्रयत्न होता असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयीन कामकाजात बाधा निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचे दिसत असल्याचेही या खंडपीठाने म्हटले आहे. एकच मागणी करत सतत याचिका करणे बंद करा असेही न्यायालयाने बजावले आहे. न्यायालयाने राबिया खान यांना जबरी दंड ठोठावण्याचाही विचार केला होता, मात्र राबिया यांच्या वकिलाच्या विनंतीमुळे हा विचार न्यायालयाने मागे घेतला.