मृताच्या कुटुंबीयांना 10 लाखांची भरपाई द्या हायकोर्टाचे पालिकेला आदेश

319
nair-hospital-

नायर रुग्णालयातील एमआरआय मशीनमध्ये अडकून मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना मुंबई उच्च न्यायालयाने आज मोठा दिलासा दिला. रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणाच तरुणाच्या मृत्यूला जबाबदार असल्याचे स्पष्ट करत खंडपीठाने मृत्युमुखी पडलेल्या तरुणाच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई म्हणून देण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत.

आपल्या सासूला पाहण्यासाठी राजेश मारू हा तरुण नायर रुग्णालयात आला होता. सासूची तपासणी करण्यासाठी तो एमआरआय केंद्रात गेला तेव्हा वॉर्डबॉय विठ्ठलने राजेशला ऑक्सिजन सिलिंडर आत नेण्याचे काम सांगितले. तेव्हा सिलिंडर धातूचा असल्याचे काहींनी वॉर्डबॉय विठ्ठलच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर एमआरआय मशीन बंद असल्याने काही होणार नाही, असे त्या वॉर्डबॉयने सांगितले, मात्र मशीन चालूच होती. आत शिरताच प्रचंड चुंबकीय शक्तीमुळे राजेश मशीनकडे ओढला गेला. त्याचा हात मशीन व सिलिंडरमध्ये अडकून मृत्यू झाला. याप्रकरणी राजेशच्या कुटुंबीयांना मार्च 2018 मध्ये मुख्यमंत्री निधीतून पाच लाख रुपयांची मदत देण्यात आली. घरातील कर्तापुरुष गेल्याने उदरनिर्वाह करायचा कसा, तसेच त्याच्या जाण्याने आम्हाला प्रचंड मानसिक वेदना सहन कराव्या लागत असून रुग्णालयाकडून नुकसानभरपाई मिळावी, त्याबाबत हायकोर्टाने आदेश द्यावेत अशी विनंती करत राजेशची बहीण लीना मारू व त्याच्या आईवडिलांनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर आज न्यायमूर्ती अकिल कुरेशी आणि न्यायमूर्ती शाहरुख काथावाला यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली. त्यावेळी हायकोर्टाने कुटुंबीयांना दिलासा देत रक्कम देण्याचे आदेश दिले तसेच ही रक्कम पाच वर्षांकरिता फिक्स डिपॉझिट करण्यात यावी जेणेकरून कुटुंबीयांना व्याज मिळत राहील अशा सूचनाही केल्या.

आपली प्रतिक्रिया द्या