दिव्यांग कर्मचाऱ्यांचे लॉकडाऊनमधील थकीत वेतन तत्काळ द्या! हायकोर्टाची पालिकेला सूचना

लॉकडाऊन दरम्यान प्रवासाच्या पर्यायी व्यवस्थेअभावी कामावर गैरहजर राहणाऱ्या दिव्यांग कर्मचाऱ्यांचा पगार कापण्याचा प्रशासनाचा निर्णय चुकीचा असून कर्मचाऱ्यांना हा पगार प्रशासनाने दोन हप्त्यात द्यावा. थकबाकीचा पहिला हप्ता दिवाळीपूर्वीच व दुसरा हप्ता 45 दिवसांच्या आत देण्यात यावा असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने पालिका प्रशासनाला दिले.

21 मे रोजी पालिका प्रशासनाने परिपत्रक काढले असून त्यानुसार दिव्यांग कर्मचाऱ्यांना भरपगारी रजा देण्याचे मान्य केले. त्यानंतर 26 मे रोजी पुन्हा परिपत्रक काढण्यात आले व सदर रजा भरपगारी नसून कर्मचारी जेवढे दिवस हजर राहतील तेवढ्या दिवसांचा पगार त्यांना देण्यात येईल असे त्या परिपत्रकात नमूद करण्यात आले.

त्यामुळे दिव्यांग कर्मचाऱ्यांना पूर्ण पगार न मिळाल्याने त्यांनी नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाइंड या संस्थेमार्फत अॅड. उदय वारुंजीकर यांच्या वतीने हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.

दिव्यांग कर्मचाऱ्यांची काळजी
लॉक डाऊनच्या काळात दिव्यांग कर्मचाऱ्यांची पालिकेने योग्य प्रकारे काळजी घेतली या कर्मचाऱ्यांच्या सुविधेसाठी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. या कर्मचाऱ्यांना रेल्वेने प्रवास करण्याचीही मुभा देण्यात आली आहे, अशी माहिती हायकोर्टात देण्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या